

खटाव : दुष्काळी खटाव तालुक्यातील येरळा नदीचे पाणी चक्क उन्हाळ्यात सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या संगमाकडे वेगाने पोहोचले आहे. 30 मे रोजी येरळा नदीचे पाणी ब्रम्हनाळ येथे कृष्णेत जावून मिसळले आहे. दुष्काळात ज्या कृष्णा नदीच्या पाण्याने येरळेचे कोरडे पात्र प्रवाहित केले जाते त्याच येरळा नदीचे पाणी आता कृष्णा नदीला मिळाले आहे.
दुष्काळी खटाव तालुक्यात मे महिन्यात रेकॉर्डब्रेक पर्जन्यवृष्टी झाली होती. कधी नव्हे ते मे महिन्याध्येच येरळा नदी प्रवाहित झाली होती. 24 मे रोजी नेर आणि 26 मे रोजी येरळवाडी धरणही भरुन ओव्हरफ्लो झाले होते. धरणातील सांडव्यावरुन होणारा पाण्याचा विसर्ग येरळा नदीतून पुढे सांगली जिल्ह्यातील कृष्णेच्या पात्राकडे झेपावले होता. कृष्णा नदीची सर्वांत लांब उपनदी म्हणून येरळा नदीचा उल्लेख होतो. प्राचीन काळी ही नदी वेदावती या नावाने ओळखली जात होती. भगवान श्रीराम यांच्यासह अनेक ऋषींनी या नदीकाठावर वेदपठण केल्याची आख्यायिका आहे.
येरळा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तरेकडील म्हस्कोबाच्या डोंगरावरील सोलकनाथ टेकडीवर झाला आहे. येरळा नदी वर्धनगडने वेढलेल्या रांगेतून वाहत जाते तर नदीच्या डाव्या बाजूस महिमानगड रांग आहे. येरळा नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी खटाव, खानापूर, तासगाव आणि पलूस तालुक्यांतील लोकांची जीवनदायिनी आहे. येरळा नदी सहामाही वाहिनी असून, इतर सहा महिने नदीचे पात्र कोरडे असते. या नदीवर नेर आणि येरळवाडी ही दोन ब्रिटिशकालीन धरणे आहेत. येरळा नदी खोर्यांचे एकूण क्षेत्रफळ 3041 चौरस किमी असून नदीची लांबी 125 किमी इतकी आहे. येरळा नदीची नांदणी ही उपनदी आहे. सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे येरळा नदीचा कृष्णा नदीशी संगम होतो.
गेल्या सहा दिवसांपासून एक हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी येरळवाडी धरणातून पुढे सांगली जिल्ह्याकडे वाहत आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता नेर धरणातून 700 तर येरळवाडी धरणातून 1030 क्यूसेक पाणी येरळेतून पुढे कृष्णेकडे झेपावत होते. दुष्काळी भागातील येरळा नदी आता पावसाळाभर वाहती राहणार असल्याने चक्क चार महिने हे पाणी ब्रम्हनाळ येथे कृष्णेत जावून मिसळणार आहे. दर वर्षी दुष्काळात कोरडी ठाक असणार्या येरळा नदीत जिहे-कठापूर योजनेद्वारे कृष्णेचे पाणी सोडले जाते. अगदी दहा दिवसांपूर्वीपर्यंत कृष्णेचे पाणी येरळेत येत होते. गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी खटाव तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत असल्याने निसर्गाची चक्रे उलटी फिरुन येरळेचे पाणी कृष्णेला जाऊन मिळत आहे.
फलटण तालुक्यातील (दंडकारण्य) ताथवडे घाटातील खटाव-माण सरहद्दीवरील पहिला डोंगर म्हसकोबाचा डोंगर आहे. कुळकजाई परिसरात खटाव-माण तालुक्याच्या सरहद्दीवर पुरातनकाळी भगवान श्रीराम वेदपठण करत होते. त्यावेळेस लक्ष्मणाने सीतामाईच्या उशाशेजारी एक गरम आणि एक गार पाणी असलेला असे दोन द्रोण ठेवले होते. पूर्व दिशेचा द्रोण म्हणजे माणगंगा, तर उत्तरेचा द्रोण बाणगंगा नदी अशी त्या काळी नावे होती. नंतर श्रीराम यांनी या ठिकाणी वेदपठण केल्याने बाणगंगेला वेदावती असे नाव पडले, तर सीतामाईंनी येरळा नदीचे रूप धारण केल्याची आख्यायिका आहे.