

सातारा : देशाच्या स्वातंत्र्यदिनाला 78 वर्षे पूर्ण होत आहेत. दि. 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय उत्सव साजरा होत असून सर्वत्र या तयारीला वेग आला आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहणा बरोबरच इतर कार्यक्रमांच्या आयोजनाची लगबग सुरु आहे. त्यामुळे कुठे कवायती तर कुठे ध्वजारोहण संचनालयातील परेड व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सराव युध्द पातळीवर सुरु आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांसह शाळा-शाळांमध्ये लेझीम, ढोल, झांजेचा आवाज घुमू लागला आहे.
देशाचा प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण म्हणून उत्साहात साजरा करण्यात येतो. शासकीय-निमशासकीय कार्यालये, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ध्वजारोहण समारंभांचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षीदेखील विद्यार्थ्यांच्या कवायती तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा-शाळांमध्ये स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे. शाळा परिसरात तसेच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे संचलन करण्यात येते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कसून सराव करुन घेतला जात आहे. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्हा क्रिडा संकुलामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार्या मुख्य ध्वजारोहण समारंभात सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातील शाळा सहभागी होतात. त्यामुळे संचलन, कवायत, सांस्कृतिक कार्यक्रमांचा सराव युध्दपातळीवर सुरु आहे. शाळा परिसरांमध्ये कवायतींचा ठेका अन् झांज, लेझीम व ढोलांचा आवज घुमू लागला आहे.
साफ-सफाईसाठी धांदल...
स्वातंत्र्यदिनी शासकीय, निमशासकीय कार्यालयाबरोबरच ग्रामपंचायत, सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ध्वजारोहण केले जाणार आहे. तसेच गुणवंत विद्यार्थी, उल्लेखनीय काम करणार्यांचा सत्कार केला जातो. त्यामुळे साफ-सफाईसह कार्यक्रमाच्या नियोजनांची धांदल उडाली आहे. ध्वजारोहणासाठी मान्यवरांना निमंत्रण देणे, उपस्थितांचा सत्कार, सन्मानाचे नियोजन व तयारीसाठीधांदल उडाली आहे.