

कराड : राज्याचे लक्ष लागलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने ऐतिहासिक विजय मिळवला. २१/० करत विरोधी संस्थापक पॅनेलचा धुव्वा उडवला. प्रत्येक उमेदवाराने सुमारे १४,७३४ हजार मतांच्या आघाडीने विजय मिळवल्याने कारखान्यावर २०१४ पासून असलेले भोसले यांचे नेतृत्व पुन्हा अधोरेखित झाले. या विजयासह डॉ. भोसले यांनी कारखान्याची सत्ता कायम राखत विजयाची हॅटट्रिक नोंदविली.
या निवडणुकीत माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. निकाल जाहीर होताच कराड, रेठरे बुद्रुक तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील भोसले समर्थकांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. गावागावांत विजयी मिरवणुका काढल्या.
कारखान्यासाठी रविवारी ८२.२६ टक्के मतदान झाले. मंगळवारी कार्वे नाका येथील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीत १ ते ७७ मतदान केंद्रांवरील १७ हजार ५०० मतांची मोजणी झाली. या फेरीत सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी साडेसात हजार मतांची आघाडी घेत विजयाची दिशा स्पष्ट केली होती. दुपारनंतर दुसऱ्या फेरीची मतमोजणी झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी अंतिम निकाल जाहीर केला. निकालात सर्व २१ जागांवर सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी एकहाती विजय मिळवत सभासदांनी कारखान्याच्या विद्यमान नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखविला. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे प्रमुख आणि विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे, धोंडिराम शंकरराव जाधव, जगदीश दिनकरराव जगताप, आनंदा सोपान खबाले, अरविंद गुणवंतराव पाटील, दयाराम भीमराव पाटील, बाजीराव नारायण थोरात, दत्तात्रय हणमंत देसाई, लिंबाजी महिपतराव पाटील, संभाजीराव आनंदराव पाटील, जयवंत दत्तात्रय मोरे, सत्यजित जितेंद्र पाटील, सुनील भीमराव पाटील, संग्राम विश्वासराव पाटील, बाबासो खाशाबा शिंदे, सुरेश जयवंतराव भोसले, बाजीराव दाजी निकम, सुजाता दीपक जाधव, सुनीता संजय शेवाळे, छबन जगन्नाथ कांबळे, अविनाश मधुकर खरात, बाळासो आकाराम जगताप.