सातारा : गृह विभागाने मंगळवारी पोलिस अधिकारी दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये सातारचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून डॉ. सुधाकर पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर पोलिस अधीक्षकपदी वैशाली कडूकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. सातार्याचे जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांची बदली मुंबई शहर येथे पोलिस उपायुक्त म्हणून झाली असून, अप्पर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांची बदली समादेशक राज्य राखीव पोलिस दल पुणे येथे झाली आहे.
सातार्याचे नूतन पोलिस अधीक्षक डॉ. पठारे हे 2011 सालचे ते आयपीएस आहेत. ते मूळचे वाळवणे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील आहेत. आयपीएस होण्याअगोदर ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले आहेत. नूतन पोलिस अधीक्षक डॉ. सुधाकर पठारे यांचे शिक्षण एम.एस्सी. अॅग्री, एलएलबी झालेले आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली ते जिल्हा विशेष लेखा परिक्षक झाले. यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे. एसपी डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलिस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका केला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलिस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.
अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर या सध्या पोलिस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे प्राचार्य आहेत. त्यांचे शिक्षण बीएएमएस, एलएलबी झाले आहे. आतापर्यंत त्यांनी उस्मानाबाद, पुणे ग्रामीण, सीआयडी पुणे येथे सेवा बजावली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची मंगळवारी मुंबई शहर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली. सातार्यात पावणे दोन वर्षे त्यांनी सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात प्रतापगड अतिक्रमण हटवणे, बेरोजगारांसाठी उंच भरारी तसेच चोरीतील सुमारे 4 किलो सोने जप्त करुन मूळ तक्रारदार यांना परत देण्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी झाली. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांची समादेशक राज्य राखीव पोलिस बल, पुणे येथे बदली झाली.
एसपी समीर शेख यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये सातारचा कार्यभार घेतला. तत्पूर्वी ते गडचिरोली येथे होते. सातार्यात आल्या आल्या पहिल्या 15 दिवसांमध्ये प्रतापगड येथील अफजलखान याच्या कबर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची दणकेबाज कामगिरी केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी टोळ्यांवर, गुंडावर त्यांनी जरब बसवण्याचा प्रयत्न केला. मोक्कांतर्गत, तडीपारी तसेच एमपीडीएच्या प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाई केल्या. याशिवाय गडकिल्ले स्वच्छता मोहिम, उंच भरारी, जनता दरबार अशा प्रभावी योजना राबवल्या. अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सातारची सूत्रे घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांना उत्कृष्ठपणे सहकार्य केले. अनेक गंभीर व क्लिष्ट प्रकरणातील गुन्ह्यात त्यांनी पाठपुरावा करुन माहिती घेत गुन्ह्यांची उकल केली.