

सातारा : ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांना छ. संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालयाकडून डी. लिट या ज्ञानक्षेत्रातील सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. अंकुश कदम यांनी केली.
विश्वविद्यालयाच्या दि. २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभात त्यांना सन्मानपूर्वक ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय संस्कृतीतील अप्रकाशित बहुजन प्रवाहावर आयुष्यभर लेखन आणि संशोधन करून साळुंखे यांनी ६५ ग्रंथांचे लेखन केले आहे. अवैदिक विचार प्रवाहाची पुनर्मांडणी हे त्यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. चार्वाक, बळी, बौद्ध तत्त्वज्ञान, संत साहित्य, वैदिक धर्मचिकित्सा या विषयावरील त्यांचा व्यासंग वादातीत आहे.
आस्तिक शिरोमणी चार्वाक, विद्रोही तुकाराम, बळीवंश, मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती, महाभारतातील स्त्रिया, हिंदू संस्कृती आणि स्त्री, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हे त्यांचे ग्रंथ भारतीय विचारविश्वात कमालीचे गाजले. हजारो व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधनाच्या चळवळीला गतिमान करण्याचे काम केले आहे. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांचा सन्मान केला जाणार आहे.