Shambhuraj Desai | तिसऱ्यांदा तोंडावर पडायची इच्छा नाही : शंभूराज देसाई

सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे जाणार नाही
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai Pudhari
Published on
Updated on

सातारा : नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये युती करण्यासाठी मी दोनदा पुढाकार घेतला होता. मात्र, दोनदा माझे प्रयत्न फसले. आम्ही युतीसाठी पुढे केलेला हात त्यांनी हातात घेतला नाही. त्याचे कारण मलाही माहीत नाही. त्यानंतर मागील अनुभव विचारात घेऊन राष्ट्रवादी व शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यात आम्हाला चांगले यश आले. दोन्ही पक्षांचे मिळून 37 इतके संख्याबळ जिल्हा परिषदेत झाले आहे. भाजपशी दोनदा चर्चा केली होती. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे जाणार नाही. दोनदा पुढाकार घेतला होता, आता तिसऱ्यांदा तोंडावर पडण्याची माझी इच्छा नाही, अशी खोचक प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांची एका हॉटेलवर बैठक झाली होती, या बैठकीतून कोणता फॉर्म्युला ठरवण्यात आला? राष्ट्रवादी-शिवसेना युती करुन जिल्हा परिषद ताब्यात घेणार? की राष्ट्रवादी-शिवसेना-भाजप असा राज्य सरकारमध्ये असलेला फॉर्म्युला जिल्ह्यातही राबवला जाणार, असे प्रश्न यावेळी पत्रकारांनी पालकमंत्र्यांना विचारले.

त्याबाबत ना. देसाई म्हणाले, भाजपचे नेते ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीबाबत पालकमंत्र्यांनीच बैठक घ्यावी, असे सूचवले होते; परंतु भाजपने माजी जिल्हाध्यक्षांना या बैठकीला पाठवले. युती करण्याबाबतचा आपल्याला अधिकार नसल्याचे या माजी जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले होते. भाजपचे नेते शहरात असतानाही ते महायुतीच्या बैठकीला फिरकले नव्हते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपने प्रतिसाद न दिल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा निर्णय केला.

फलटण, कराड, पाटण व जावली तालुक्यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी युतीला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरात आमच्या युतीचे तब्बल 37 सदस्य निवडून आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ओघानेच एका हॉटेलवर माझी ना. मकरंद पाटील व खा. नितीनकाका पाटील यांची भेट झाली. निवडणुकीतील यशाबाबत एकमेकांशी चर्चा केली.

पक्षाचा निर्णय मान्य

पाटण, वाई, फलटण या ठिकाणी एकत्रित येत हे यश मिळवले आहे. त्याच अनुषंगाने ही चर्चा होती. बाकी अध्यक्ष कुणाचा, उपाध्यक्षपद वाटून घेणार, सभापतिपदांचे काय होणार, अशी कोणतीही चर्चा आम्ही केलेली नाही; मात्र आमचा पक्ष जो निर्णय घेईल, त्यात आम्हाला आनंद आहे, असेदेखील ना. देसाई यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news