CM  Devendra Fadnavis / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPudhari

Doctor woman death case: डॉक्टर युवती मृत्यूप्रकरणी न्यायाधिशांमार्फतही चौकशी : मुख्यमंत्री फडणवीस

शोषण आणि फसवणुकीमुळेच मृत्यू
Published on

नागपूर/सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पारदर्शक पद्धतीने सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी कुणी आहे का? हेही तपासले जाणार आहे. त्याअनुषंगाने स्वतंत्र न्यायाधिशांमार्फतही चौकशी केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपूर येथील अधिवेशनात दिली.

दरम्यान, हातावरील सुसाईड नोटमधील अक्षर हे पीडित महिला डॉक्टरचेच असल्याचे न्यायवैद्यक तपासणीत आढळले आहे. आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेचे शारीरिक शोषण आणि फसवणूक केल्याचे तपासात उघड झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने शहरातील नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवले होते. तिने तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये पीएसआय गोपाल बदने व प्रशांत बनकर यांची नावे होती. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरण मंगळवारी अधिवेशनात गाजले.

भाजप आमदार अमीत साटम यांनी सभागृहात फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यूबाबत तारांकीत प्रश्न मांडला. महिला डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोट आणि याप्रकरणातील दोन्ही आरोपींबाबत खुलासा करण्याची मागणी केली. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या घटनेची एसआयटी तसेच न्यायिक अशा दोन पातळ्यांवर चौकशी सुरू आहे. न्यायवैद्यक तपासणीत मृत महिला डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोटमधील अक्षर हे तिचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, या प्रकरणातील पहिला आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याने महिला डॉक्टरचे शारीरिक शोषण करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तर, दुसरा आरोपी प्रकाश बनकर याने फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. गळफास घेतल्यानेच डॉक्टरचा मृत्यू झाला आहे, गळा आवळून मृत्यू झालेला नाही, असे सांगत डॉक्टरचा मृत्यू आत्महत्या असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी दिला. ही आत्महत्या नसून हत्या असल्याच्या चर्चांवरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णविराम लावला.

राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सर्व संबंधितांची चौकशी करण्यात आली आहे. या विषयी गुन्हा दाखल झाला असून गुन्हेगारांना अनफिट प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण हे पाच महिन्यापूर्वीचे होते. शोषण आणि फसवणूक हे आत्महत्येमागील महत्वाचे कारण समोर आले आहे. तसेच आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टर हॉटेलमध्ये आली त्याचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बदनेने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केले : मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात अत्यंत धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले, या प्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल आला आहे. त्यानुसार पीएसआय बदने याने संबंधित युवतीचे शारीरिक शोषण केल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय बदने व संबंधित युवतीचे चॅटही तसेच सांगत आहे.

लग्नाचे आमिष दाखवल्याचे यात दिसत आहे आणि नंतर तिची फसवणूक करून बदनेने वेगळी भूमिका घेतली आहे. दुसऱ्या संशयित आरोपीनेही तिची फसवणूक केली आहे. त्यामुळे दोघांचीही नावे तिने हातावर लिहिली. याप्रकरणाची आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. मात्र, अन्य मुद्द्यांच्या अनुषंगाने स्वतंत्र न्यायाधिशांमार्फत चौकशी सुरू आहे. यात जे कुणी दोषी आढळतील, त्यांना सोडले जाणार नाही.

संबंधित युवतीच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी दिली जाईल का, असे सभागृहात विचारले असता, संबंधित युवती कंत्राटी पद्धतीने नोकरीला असल्याने अनुकंपाखाली नातेवाईकांना नोकरी मिळणार नाही. मात्र, त्या कुटुंबाला कशा पद्धतीने मदत करता येईल, याबाबतचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news