Phaltan Doctor News: माझा मृत्यू झाल्यास माजी मंत्र्याचा पीए जबाबदार

डॉक्टरच्या सुसाईड नोटने खळबळ : फलटण पोलिसात गुन्हा
Phaltan Doctor News: माझा मृत्यू झाल्यास माजी मंत्र्याचा पीए जबाबदार
Published on
Updated on

फलटण : डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात आणखी एका संवेदनशील घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रूपनवर यांच्या हातावर संशयास्पद मृत्यू झाल्यास माजी मंत्र्याचा पीए जबाबदार राहील, असा मजकूर लिहिल्याने व त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयिताच्या शोधासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात हा प्रकार घडला. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांच्यासह काही व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी प्रसाद प्रदीप कोंडेदेशमुख (रा. जावली, जि. सातारा) आणि त्याच्यासोबत आलेल्या काळ्या सफारी पोशाखातील एका अनोळखी व्यक्तीने अरेरावीची भाषा वापरत दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, वाद वाढल्यानंतर सफारी पोशाखातील व्यक्तीने डॉ. रूपनवर यांच्या अंगावर धाव घेत त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली तसेच ‘मार दूंगा’ अशी धमकी दिली. त्यानंतर प्रसाद कोंडेदेशमुख यांनी ‘हे तुला खूप महागात पडेल, उद्या सकाळी समजेल मी कोण आहे’, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटलेे आहे. या प्रकारामुळे डॉक्टरांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला पोलिस उपनिरीक्षक गाजरे पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, यापूर्वी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे फलटण उपजिल्हा रुग्णालय राज्यभर चर्चेत आले होते. त्या प्रकरणाची चर्चा अद्याप सुरू असतानाच आता वैद्यकीय अधिकाऱ्याशी संबंधित धमकी, कथित मानसिक छळ आणि त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे रुग्णालयातील प्रशासकीय वातावरण, कर्मचारी सुरक्षा आणि कार्यपद्धतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news