CM Devendra Fadnavis | नगरपालिकांना भ्रष्टाचाराचा अड्डा बनू देऊ नका : मुख्यमंत्री फडणवीस

सातारा जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणा
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis | नगरपालिकांना भ्रष्टाचाराचा अड्डा बनू देऊ नका : मुख्यमंत्री फडणवीस Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत विरोधक भुईसपाट झाले आहेत. अनेक वर्षे काहींना वाटत होते की, सातारा जिल्हा त्यांचा आहे; मात्र नगरपालिका निवडणुकीत जनतेने भाजपला निवडून दिले आहे. आता नगरपालिका झाली असून सातारा जिल्हा परिषदेवर इतिहासात पहिल्यांदाच भाजपची सत्ता आणा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दरम्यान, नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवकांनी नगरपालिकांना भ्रष्टाचाराचा अड्डा बनू देऊ नका, अशा शब्दांत फडणवीसांनी कानही टोचले.

सातारा जिल्हा परिषदेतील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात भाजपचे नूतन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, आ. मनोजदादा घोरपडे, आ. अतुलबाबा भोसले, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, माजी आमदार मदनदादा भोसले, धैर्यशील कदम, विक्रम पावस्कर, डॉ. चित्रलेखा माने, डॉ. प्रिया शिंदे, सुरभि भोसले, सुनील काटकर, राजू भोसले, अविनाश कदम यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सातारा नगराध्यक्ष अमोल मोहिते, म्हसवडच्या पूजा विरकर, मलकापूरचे तेजस सोनावले, वाईचे अनिल सावंत, रहिमतपूरच्या वैशाली माने, मेढ्याच्या रूपाली वारागडे, फलटणचे समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्यासह नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, साताऱ्यात विक्रमी मतांनी नगराध्यक्ष निवडून आले असून वाई येथे भाजपचा नगरसेवक निवडून येईल की नाही, अशी शंका व्यक्त केली जात असताना थेट नगराध्यक्षपद भाजपकडे आले. तसेच म्हसवड आणि मलकापूर येथे पूर्ण क्षमतेने सत्ता मिळवत भाजपने आपले संघटनबळ सिद्ध केले आहे. ऐतिहासिक राजधानी असलेल्या साताऱ्यात महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्क्याने नगराध्यक्ष निवडून आणण्याचे काम जनतेने केले. साताऱ्यात काय परिवर्तन होते हे ना. शिवेंद्रराजे व उदयनराजेंनी दाखवून दिले आहे. राज्यात साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते हे विक्रमी मतांनी निवडून आले. साताऱ्यात विजय अपेक्षितच होता कारण तेथे शिवेंद्रराजे व उदयनराजे होते. दोन्ही राजेंच्या एकत्र येण्यामुळे साताऱ्यात विरोधकांचा सुपडासाफ झाला. मोठया संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून येण्यात संगठन व दोन्ही राजेंची मेहनत कामाला आली, असे फडणवीस म्हणाले.

राज्यभरात भाजपचे सुमारे 130 नगराध्यक्ष आणि तीन हजारांहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणुकीमध्ये इतर पक्षांच्या तुलनेत दुप्पट नगरसेवक भाजपने निवडून आणले आहेत. युतीच्या माध्यमातून तब्बल 75 टक्के जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे विरोधक भुईसपाट झाले आहेत.

महाराष्ट्राच्या विकासावर नागरी भागाने शिक्कामोर्तब केले आहे. अनेक वर्षे काहींना सातारा जिल्हा हा त्यांचा आहे, असे वाटत होते. मात्र, पण जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नगरपालिका जनतेच्या झाल्या आहेत. आता नगरपालिका झाली असून जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा लागणार आहे हा माझा आत्मविश्वास आहे. मला राजकारणात कुठे काय चालले आहे ते समजते आणि वारे कळते, असेही फडणवीस म्हणाले.

साताऱ्यातील नागरी भागाने भाजपवर विश्वास ठेवला आहे. पुढील पाच वर्षांत भाजपने केलेला विकास लोकांना दिसला पाहिजे. पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकांमध्ये पारदर्शक कारभार करावा. नगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा होऊ देऊ नका. निधीचा एकही पैसा इकडे-तिकडे जाऊ देऊ नका. ठेकेदार व गुत्तेदारांना पालिकेत स्थान देवू नका. पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन करा. या विजयामागे संघटनेचे मोलाचे योगदान असून आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले. याच मेहनतीच्या जोरावर जिल्हा परिषदेतही सत्ता मिळवून पुन्हा विजयाचा उत्सव साजरा करू. जशी नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार केला. तसाच सत्कार याच सभागृहात अध्यक्ष व सदस्यांच्या सत्काराला येईन, असा विश्वास ना. फडणवीस यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news