

कराड : डीजे व अन्य स्पीकर बंद करण्यास भाग पाडल्यानंतर कराडात गुरुवारी मध्यरात्री नवरात्रौत्सव मंडळांच्या 500 हून अधिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर चार तास ठिय्या आंदोलन केले. यामुळे तणाव निर्माण झाला. तीन मंडळांच्या पदाधिकार्यांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, कार्यकर्त्यांचे मोबाईल काढून घेण्यार्यांची चौकशी करू, नियम भंग करणार्या मंडळांवर कारवाई केल्यावर ध्वनिक्षेपक यंत्रणा परत करू, या पोलिसांच्या भूमिकेनंतर पहाटे चारला कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
विजयादशमीला सायंकाळी शहरातील नवरात्र मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. 60 अधिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुमारे 11 तास सुरू होत्या. बहुतांश मंडळांनी डीजेसह मोठ्या आवाजाचे स्पीकर वापरले होते. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होताच पोलिसांनी रात्री 11 वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद करण्यास भाग पाडले. यामुळे शहरातील चावडी चौक, आझाद चौक, शुक्रवार पेठ या परिसरात कार्यकर्ते व पोलिसांमध्ये खटके उडाले. डीजेसह ध्वनिक्षेपक ऑपरेटरची पोलिसांनी धरपकड केली, मोबाईल काढून घेतल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्याची परवानगी असतानाही एक तास अगोदरच ध्वनी यंत्रणा बंद केल्याने विविध मंडळांच्या 500 हून अधिक संतप्त कार्यकर्त्यांनी शहर पोलिस ठाण्यसमोरील रस्त्यावर ठाण मांडले. पोलिसांनी बॅरिकेडस् लावून शहर पोलिस ठाण्याचे गेट बंद केले होते.
या कार्यकर्त्यांसोबत पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार व अन्य अधिकारी चर्चा करत होते. मात्र , कार्यकर्ते ऐकत नव्हते. अखेर पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी वरिष्ठांसह कार्यकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक पाऊल मागे घेतले. दरम्यान, मिरवणुकीत अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैसाली कडुकर, पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्यासह अधिकार्यांच्या उपस्थितीत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
अन्यायकारक कारवाई केल्याची भावना
वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष करणार्या तीन मंडळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी विनाकारण ऑपरेटर्सना मारहाण केली आहे. काहींचे मोबाईल काढून घेतल्याचा दावा करत पोलिसांनी अन्यायकारक भूमिका घेतल्याचा दावा मंडळांकडून केला जात आहे.