

सातारा/वाई : पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी साऊंड सिस्टीमचा दणदणाट करणार्यांना दणके देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात मंगळवारी वाई आणि सातारा येथे पोलिसांनी कारवाई करत साऊंड सिस्टीमसह वाहने जप्त केली. वाईमध्ये तिघांवर तर सातार्यातील डबेवाडी येथे दोन ठिकाणी कारवाई करत गणेश मंडळ अध्यक्ष, चालक व मालक अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. साऊंड सिस्टीमचा दणदणाट करून वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे.
सातार्यातील आझाद हिंद सांस्कृतिक मंडळ डबेवाडीचे अध्यक्ष दर्शन दयानंद माने, साऊंड सिस्टीम मालक प्रतीक सुनील माने, ट्रॅक्टर चालक अनिकेत संजय माने यांच्यावर गुन्हा दाखल केला. दुसरा गुन्हा काळेश्वरी प्रतिष्ठान अध्यक्ष कुलदीप धर्मेंद्र माने, साऊंड सिस्टीम व टेम्पो मालक मयुरेश मंगेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. तर वाईमध्ये प्रसाद सुरेश जाधव (रा. खानापूर), आकाश मुकुंद कांबळे (साऊंड सिस्टीम व्यवसायिक, रा. सोनगिरवाडी) आणि कुणाल खरात (रा. सोनगिरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस प्रसाद बबन दुदुस्कर (रा. वाई) यांनी फिर्याद दिली आहे.
पोनि नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद नेवसे, पोलिस राजू शिखरे, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, दादा स्वामी, किरण निकम, प्रदीप मोहिते, संदीप पांडव, शंकर गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला. तर वाई शहरातही मंगळवारी रात्री सोनगिरवाडी परिसरात एका गणेश मंडळाची आगमन मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत ट्रॅक्टरवर साऊंड सिस्टीम लावून मोठा आवाज सोडला होता. यावेळी पोलिसांनी आवाज कमी करण्यास सांगितला. मात्र, पोलिसांनी न ऐकता आवाजाची मर्याद ओलांडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला.