

सातारा : दिवाळीचा माहोल असल्याने सातारा शहर व परिसरात प्रमुख रस्त्यांवर गर्दी ओसंडून वाहू लागली आहे. साताऱ्यात राजवाडा, मोती चौक, पोवईनाका, खणआळीसह अन्य ठिकाणी खरेदी करावयाची आहे, पण गाडी लावायची कुठे? असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे. पार्किंगची दिवाळीत ग्राहकांसाठी नेहमीचीच डोकेदुखी ठरली आहे.
सातारा हे जिल्ह्याचे व तालुक्याचे ठिकाण आहे. साताऱ्यातील पोवईनाका ते राजवाडा तसेच मोतीचौक ते पोवईनाका व राधिका चौक ते मार्केट यार्ड, शाहू चौक ते समर्थ मंदिर हे वर्दळीचे रस्ते आहेत. त्यामुळे या रस्त्यावरच विविध दुकाने आहेत. त्यामुळे सण समारंभ म्हटले की खरेदीसाठी जिल्ह्यातील खेडोपाड्यातील नागरिकांचा साताऱ्याकडे ओढा असतो. त्यामुळे दिवाळीमध्ये बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वहात असते.
सध्या दिवाळीचा माहोल असल्याने पोवईनाका, राजपथ, कमानी हौद, देवी चौक, मोती चौक, गोलबाग, खणआळी, सदाशिव पेठ, पाचशे एक पाटी, एसटी स्टँड परिसर, मार्केट यार्ड परिसर येथे खरेदीसाठी नागरिक तुडूंब गर्दी होत आहे. खरेदीसाठी येणारे नागरिक हे वाहनाने येत आहेत. मात्र, बाजारात आल्यानंतर वाहन पार्क कुठे करायचे? असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहेत. त्यामुळे अनेक जण गाडीवर बसूनच खरेदी करत आहेत. गर्दी असतानाही वाहने घुसडल्याने सर्व रस्ता ब्लॉक होत आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्वच रस्त्यांवर ट्राफिक जाम लागत आहे.
बाजारपेठ परिसरात पार्किंगसाठी जागाच नाही हे माहित असूनही नागरिक ज्या ठिकाणी पार्किंगची सोय आहे तेथे जात नसल्याचेही चित्र आहे. त्यामुळे गर्दीच्या गराड्यातून वाहने चालवताना नाकीनऊ येवू लागले आहे. वाहनांची संख्या नियंत्रणात नसल्याने कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांनाही इच्छा असूनही काहीच करता येत नाही. लक्ष्मीपूजन झाले असले तरी बुधवारी पाडवा व गुरूवारी भाऊबीज आहे. त्यामुळे गर्दी आणखी वाढणार असून पार्किंगची समस्या जटील बनणार आहे.