सातारा : सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत आहे. खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, या आनंदात नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या; पण जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची दिवाळी शेतात भात काढणी, रब्बीच्या पेरणी यासह इतर कामे करण्यात जात आहेत. मोठ्या कष्टाने शेतातून माणिक मोती रुपी धान्य पिकवून जगाचे पालन पोषण करणार्या जिल्ह्यातील शेतकर्यांचे कुटुंब सध्या शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात भात काढणी व दिवाळी हे एकत्रच सुरू होते. शेतकरी बांधव भात काढणीच्या कामास एकदा सकाळी गेला की संध्याकाळीच घरी परत येतो. त्यातच सध्या सोयाबीन काढणी व मळणी, भुईमूग काढणी अशी कामे सुरु आहेत. यामुळे त्याच्या कुटुंबाला दिवाळी फराळ करायला फारसा वेळ मिळत नाही. दिवाळीत अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. परंतु शेतकर्यांना शेतातच काम करताना घामातूनच अभ्यंगस्नान घडते. गुडघाभर चिखलात काम करताना हाता कोपरापर्यंत चिखलाने माखतात. चिखल माती गाळाने अंग माखणे हेच त्याचे उटणे लावून घेणे आहे. त्यालाच अभ्यंगस्नान करणे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दिवाळीत सर्व जण नवीन कपडे, फटाके, सोने, चांदीचे दागिने यांची खरेदी करताना आपण पाहतो. परंतु यात बळिराजा अशी खरेदी करताना आपणांस का दिसत नाही? हा प्रश्न अनुत्तरित आहे. शेतकर्यांच्या मुलाला दिवाळीत नवीन कपडे मिळतात का? भरपूर मिठाई, फटाके मिळतात का? याचेही उत्तर शोधायला हवे. अगदी काही अपवाद वगळून जगाच्या पोशींद्यांची ही परिस्थिती बदलायला नको का? एक म्हण आहे ‘राजाला दिवाळी काय माहीत’ त्यात बदल करून असे म्हणायला हवे ‘बळीराजाला दिवाळी काय माहीत’.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा केला. परंतु इतक्या वर्षात सारा देश बदलला. मात्र बळीराजाची परिस्थिती आहे त्यापेक्षा भयानक झाली आहे. सततची नापिकी, दुष्काळ, पिकांवरील रोग,वाढता मजुरी खर्च, बी बियाणे खते आणि यातून हातावर पडणारे जेमतेम उत्पन्न यातनच त्याचे आयुष्य गुरफडत आहे. परंतु जगाला अन्न देणार्या शेतकर्यांच्या बांधावर कोणी जाऊन दिवाळी फराळ वाटला का? त्याच्या मुलांस एखादा नवीन ड्रेस दिला का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.