Satara News: कास जलवाहिनी कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

धरण प्रकल्पाला भेट : पाणी वितरण व्यवस्थेची घेतली माहिती
Satara News
Satara News: कास जलवाहिनी कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी Pudhari
Published on
Updated on

सातारा : साताऱ्याच्या पश्चिम भागात पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली. अमृत 2.0 योजनेंतर्गत शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेसाठी नव्याने करण्यात येणाऱ्या जलवाहिनी कामाची पाहणी त्यांनी केली असून सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडून या प्रकल्पाची माहिती घेतली.

यावेळी सातारा प्रांताधिकारी आशिष बारकुल तसेच आरोग्य सभापती धनंजय जांभळे, अभियंता दिग्विजय गाढवे प्रमुख उपस्थित होते. कास धरण हे साताऱ्याच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी मानले जाते. साताऱ्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर धरणाची उंची वाढवण्यात आल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. या अनुषंगाने शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम अमृत 2.0 योजनेतून करण्यात येत असून सध्या ते अंतिम टप्प्यात आले आहे.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाहणीदरम्यान मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडून जलसाठ्याची स्थिती, पाईपलाईन कामाची प्रगती, भविष्यातील पाणी मागणी आणि प्रकल्पाची कार्यक्षमता आदि कामांची सविस्तर माहिती घेवून चर्चा केली.

कास धरणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी महत्त्वाची असून साताऱ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्यादृष्टीने कास धरणाचे महत्त्व आहे. धरणाची उंची वाढवल्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर प्रभावी उपाय होणार असून दीर्घकालीन पाणी नियोजनाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच पर्यटनवाढीच्या दृष्टीनेही धरण परिसरात विविध सुविधा उपलब्ध व विकसित करण्यात आल्या आहेत. पर्यटकांसाठी आकर्षक पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत. परिसराच्या सुशोभिकरणावर भर देण्यात आला आहे. जलसंधारण आणि पर्यटन या दोन्ही बाबींचा समन्वय साधत सातारा पालिकेकडून कास धरण परिसराचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अमृत 2.0 योजनेंतर्गत राबवण्यात येणारा हा प्रकल्प पूर्णत्त्वास गेल्यानंतर सातारा शहरातील पाणीपुरवठा नियमित, मुबलक व दीर्घकाळ होणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या असेल्या पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने वेगाने काम सुरु ठेवले आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केलेल्या पाहणीमुळे नव्याने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनी कामाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. यावेळी कास ग्रामस्थ, महसूल कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news