

वेलंग : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी वाई तालुक्यातील दुर्गम पश्चिम भागात असणार्या जोर गावास भेट दिली. यासाठी आदिवासी बांधवांंसोबत त्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात जिल्हाधिकारी यांची मिरवणूक काढली. दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी स्वत: ढोल वाजवत पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर ताल धरला.
शनिवारी रक्षाबंधन सणानिमित्त वाई तालुक्यातील दुर्गम जोर गावात जिल्हाधिकार्यांनी भेट दिली. जिल्हाधिकार्यांचे गावात आगमन होताच आदिवासी बांधवांनी त्यांचे औक्षण केले. तसेच भव्य मिरवणूकही काढली. जिल्हाधिकारी गावात आल्याने ग्रामस्थ भारावून गेले होते. स्वागत झाल्यानंतर आदिवासी बांधवांनी आपले पारंपारिक नृत्यासाठी फेर धरला. या नृत्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी सहभागी होत आदिवासी बांधवांसोबत नृत्य केले. यानंतर स्वत: गळ्यात ढोल अडकवून ढोल वाजवण्याचाही आनंदही लुटला. त्यानंतर आदिवासी बांधवांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. आदिवासी महिलांनी त्यांचे औक्षण करून राखीही बांधली. यावर जिल्हाधिकार्यांनी महिलांना भेटवस्तू देत बंधूभाव द़ृढ केला.
यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा प्राथमिक स्वरूपात लाभ देण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मिटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील, अविनाश ठोंबरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
संतोष पाटील म्हणाले, जोर गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. या गावालगत दोन धरणे आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यासाठी स्थानिक आदिवासी बांधवांनी पर्यटन विभागाच्या योजनेचा लाभ घेऊन होम स्टे, बोटिंग क्लब यासह विविध सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करुन द्याव्यात. आदिवासी विभागानेही अशा प्रस्तावास सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे व आवश्यक ते सहकार्य करावे.
जोर येथील जिल्हा परिषद शाळेचा ‘माझी शाळा आदर्श माझी शाळा’ उपक्रमात समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी येथील शाळेला निधी देण्यात येईल. येथील शिक्षकांनीही देण्यात आलेल्या सुविधांचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वापर करावा, असेही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले. यावेळी जोर गावातील 100 जणांना जातीचे दाखले दिले आहेत.
जिल्हाधिकार्यांची भावनिक अटॅचमेंट
प्रशासकीय यंत्रणेचा सरकारी बाबू म्हणून काम न करता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हावासीयांशी भावनिक अटॅचमेंट निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी परळीतील दुर्गम भागात असणार्या गावाला भरपावसात भेट दिली. यावेळी केवळ प्रशासन म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून तुमच्या समस्या जाणून घ्याला आलोय, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. शनिवारी रक्षाबंधनाला समाजाच्या मुख्य प्रवाहात नसणार्या आदिवासी बांधवांची भेट घेत प्रशासन हे सर्वांसाठी समान असल्याचा संदेश दिला. योजना राबवण्यासाठी नव्हे, तर माणसाचे दु:ख जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी जिल्हावासीयांशी साधलेली जवळीक ही मोलाची ठरते.