

खटाव : सर्वोच्च यश मिळवण्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असली तरी त्यामागचा मार्ग जिद्द, संघर्ष आणि मेहनतीचा असतो. अशाच मार्गावर एकमेकींशी निकोप स्पर्धा करत मार्गक्रमण करणार्या दोन सख्ख्या जुळ्या बहिणींनी उत्तुंग यशाला गवसणी घातली आहे. खटाव तालुक्यातील दीपाली दशरथ कर्णे हिने यूपीएससी परीक्षा क्रॅक करून भारतीय सांख्यिकी सेवा (खडड) विभागात वर्ग एकचे पद मिळवले आहे.
राज्यात पहिली तर देशात 24 वी येण्याचा बहुमान दीपालीने मिळवला. विशेष म्हणजे दीपालीची बहीण रूपालीनेही 2021 साली याच पदाला गवसणी घातली होती. रूपाली पाठोपाठ दीपाली या जुळ्या बहिणीने यूपीएससीत अनोखे सीमोल्लंघन करत विजयादशमी साजरी केली आहे.
खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील दशरथराव कर्णे यांच्या धाकट्या दोन जुळ्या मुलींनी पाठोपाठ संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा क्रॅक करत यशाचे सर्वोच्च शिखर पादाक्रांत केले आहे. दीपाली आणि रूपाली कर्णे या दोघीही स्पर्धा परीक्षांद्वारे यश मिळवण्याची स्वप्ने पाहणार्या विद्यार्थ्यांसाठी रोलमॉडेल ठरल्या आहेत. दशरथ कर्णे यांना योगेश हा थोरला मुलगा आहे. तो सध्या एका महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहे. कर्णे यांना तीन मुली आहेत. थोरलीचे लग्न होऊन ती वेल सेटल्ड आहे.
धाकट्या रूपाली आणि दीपाली या दोन जुळ्या मुली लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. दोघींचेही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या डिस्कळ आणि सोळांकूर (जि. कोल्हापूर) शाळांमध्ये झाले. माध्यमिक शिक्षणाही येथे झाले. लहानपणापासूनच दोघींनीही शिष्यवृत्ती, दहावी, बारावी बोर्ड परीक्षांमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळवले होते. वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्या दोघीही सातारा जिल्ह्यात आल्या. यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात त्यांनी सांख्यिकी (संख्याशास्त्र) या विषयातील पदवी प्राप्त केली. त्यानंतर दोघीही पदव्युत्तर शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठात दाखल झाल्या. यादरम्यान, त्यांनी सर्वोच्च यश मिळवण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन देशातील सर्वांत कठीण यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. एमएस्सी अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर ध्येयवेड्या कर्णे भगिनी सेट परिक्षेतही टॉपर आल्या. 2021 साली रुपालीने युपीएससी परिक्षेत राज्यात पहिली तर देशात 5 वी रँक मिळवून यश मिळवले होते. तिची भारतीय सांख्यिकी विभागात वर्ग एकच्या अधिकारीपदी निवड झाली होती.
दरम्यानच्या काळात दिपालीचेही प्रयत्न सुरु होते. तीच्याही प्रयत्नांना यश आले असून ती राज्यात पहिली आणि देशात 24 वी रँक मिळविली आहे. दिपाली सध्या आरोग्य विभागात सांख्यिकी अन्वेषक म्हणून कार्यरत आहे. कर्णे कुटुंबातील दोन जुळ्या बहिणी क्लास वन अधिकारी झाल्याने डिस्कळ गावात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. कर्णे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.