सातारा जिल्ह्यात सोमवारी पावसाची उघडझाप सुरू होती. त्यामुळे धोम, कण्हेर, उरमोडी, धोमबलकवडी धरणांतून नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला. त्यामुळे कृष्णा, वेण्णा नदीपात्रातील पाण्याखाली गेलेले पूल मोकळे झाले. दरम्यान, विविध पुलांवर जलपर्णीचे ढीगच्या ढीग साचले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस सातारा जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.
जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावली तालुक्याच्या पश्चिम भागातही पावसाच्या सरी कमी प्रमाणात होत्या. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ होत नाही. त्यामुळे धरणांची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी सोडण्यात आलेला विसर्ग धरण व्यवस्थापनाने बंद केला आहे. धोम बलकवडी धरणातून सकाळी 11 वाजल्यापासून सर्व सांडव्यांद्वारे सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे; मात्र विद्युतगृहातून 330 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सर्व दरवाजांतून कृष्णा नदीपात्रात सोडण्यात
येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. उरमोडी धरणातून विसर्ग पुर्णत: बंद करण्यात आला आहे. मात्र विद्युतगृहातून 450 क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. कण्हेर धरणातून वेण्णा नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. मात्र कालव्यातील 380 क्युसेक विसर्ग विद्युतगृहाद्वारे सुरू आहे. कोयना धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग कमी करुन तो 40 हजार क्युसेक करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडण्यात आलेले बंद करण्यात आले असल्याने, कृष्णा, वेण्णा, उरमोडी, निरा नदीमधील पूर पातळी मोठ्या प्रमाणात ओसरली आहे. त्यामुळे छोटे-मोठे पाण्याखाली गेलेले पूल मोकळे झाले आहेत. मात्र पुलाच्या ठिकाणी जलपर्णी वनस्पतीसह झाडे झुडपे अडकली आहेत.
सातारा जिल्ह्यात सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 9.7 मि.मी., जावली 32.3 मि.मी., पाटण 8.6 मि.मी., कराड 4.2 मि.मी., कोरेगाव 5.2 मि.मी., खटाव 1.4 मि.मी., माण 0.5 मि.मी., फलटण 0.3 मि.मी., खंडाळा 2.3 मि.मी., वाई 10.0 मि.मी., महाबळेश्वर 31.4 मि.मी. पावसाची नोंद झाली.