Disabled teacher death: दिव्यांग शिक्षकाचा मृत्यू झेडपीच्या गलथानपणामुळे

माजी खासदार अमर साबळेंचा खळबळजनक आरोप : दिव्यांगांची तपासणी ही लाजिरवाणी बाब
Disabled teacher death |
पत्रकार परिषदेत माहिती देताना अमर साबळे, शेजारी अरविंद मेहता व सुधीर अहिवळे.Pudhari Pudhari
Published on
Updated on

फलटण : निरगुडी, ता. फलटण येथील जि. प. शाळेतील शिक्षक सचिन काकडे यांच्या मृत्यूस सातारा जिल्हा परिषदेतील प्रशासकीय अधिकार्‍यांचा गलथान कारभारच कारणीभूत असून जिल्हा परिषदेचा कारभारच ‘मोहम्मद तुघलकी’ पद्धतीने सुरू आहे. दिव्यांगाची तपासणी प्रक्रियाच चुकीची आहे. दिव्यांगासोबत त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्याचा प्रयत्न ही तर लाजिरवाणी बाब आहे. एवढेच नाही तर मृत शिक्षकाची तपासणी करण्याचा आदेशही झेडपी प्रशासनाने दिला होता, असे गंभीर आरोप भाजपचे राज्य उपाध्यक्ष माजी खासदार अमर साबळे यांनी फलटण येथील पत्रकार परिषदेत केला आहे.

अमर साबळे म्हणाले, सुरुवातीला झालेल्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत सचिन काकडे व अन्य कोणावरही आक्षेप नसताना दिव्यांगांच्या फेर तपासणीचा घाट घालून दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांच्या फेर तपासणीचा आदेश हाच मुळी संबंधित शिक्षकांचा छळवाद ठरतो. शासनाच्या एका विभागाने दिलेले मूळचे अपंगत्व प्रमाणपत्र दुसर्‍या तपासणीत कमी दाखवणे चुकीचे आहे. त्या आधारे संबंधितांना सेवेतून निलंबित करण्याचे सूचित करणे, चुकीचे आरोप करून त्यांचे नैतिक खच्चीकरण करणे, मानसिक त्रास होईल, अशा नोटीसा देणे, तातडीने खुलासा मागणे यातूनच शारीरिक मानसिक त्रास झाल्यानेच सचिन काकडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी भ्रष्ट मार्गाने दिव्यांगांना कोंडीत पकडून त्यांच्याकडून पैसे उकळत आहेत. प्रामाणिक दिव्यांगांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. बोगस दिव्यांगांवर कारवाई झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले.

शासनाच्या वैद्यकीय समितीने प्रमाणित केलेलं दिव्यांग प्रमाणपत्र अचानक बोगस म्हणणे म्हणजे शासनाच्या एका विभागाने दुसर्‍या विभागास बोगस म्हणण्यासारखे होते. म्हणजेच शासनाच्या विभागात भ्रष्टाचार असल्याचे सिद्ध होते? दिव्यांग टक्केवारीत थोडाफार बदल झाला असेल तर दिव्यांगांचे मूळचे प्रमाणपत्र देणार्‍यावर खटला भरणार आहात का? असा सवाल करून साबळे पुढे म्हणाले, ज्यांचे दाखले रद्द केले आहेत ते न्यायालयात गेले असताना न्यायालयीन बाब असताना कारवाईचा आदेश देणे म्हणजे न्यायालयाचा अवमान होत नाही का? सातारा जिल्हा प्रशासनाने दिव्यांगांबाबत जे आदेश काढलेत त्यातील त्रुटी पाहाव्यात. विनाकारण केलेली कारवाई मागे घ्यावी. प्रामाणिक दिव्यांगांची प्रशासनाने पाठ राखण करावी, अन्यथा न्यायालयीन संघर्ष अटळ आहे. कोणत्याही परिस्थितीत अधिकार्‍यांची मनमानी व दिव्यांग शिक्षकांचा छळ थांबवावा. तसेच सचिन काकडे यांच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही अमर साबळे यांनी केली आहे.

धमक्या देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न...

शिक्षकांना पोलीस कारवाई आणि निलंबनाच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू असून कराड येथील एका हॉटेलमध्ये बसून अपात्र दिव्यांग यादीतून नाव वगळण्यासाठी संबंधितांकडून पैसे मागितले जात असल्याचा गंभीर आरोपही अमर साबळे यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news