

सातारा : सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे खोटे सांगत व डिजिटल अटकेची भीती दाखवत वेगवेगळ्या खात्यांवरील तब्बल 1 कोटी 39 लाख 50 हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेऊन सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याची घटना चितळी, ता. खटाव येथे घडली. भामट्यांनी कृषी संशोधक मालोजीराव नामदेव पवार (वय 74, रा.चितळी, ता. खटाव) या वृद्धाला गंडा घातला. याप्रकरणी सातारा सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत मूळ रकमेतील 6 लाख रुपये हस्तगत केले आहेत. ही घटना 14 नोव्हेंबरपासून वेळोवेळी घडली आहे.
मालोजीराव पवार हे कृषी संशोधक म्हणून कार्यरत होते. शेतीविषयी अनेक संशोधने त्यांनी केली आहेत. सध्या ते शेती करत आहेत. रानात काम करत असताना अनोळखी मोबाईलवरुन त्यांना फोन आला. फोनवरील संशयिताने मी टेलीकॉम सर्व्हिसमधून बोलतोय, तुमचा मोबाईल क्रमांक व आधारकार्ड हे ब्लॉक केले जाईल. कारण तुमच्या आधारकार्डचा संदीप कुमार या नावाच्या व्यक्तीने गैरवापर करून एका बँकेत तुमच्या नावाने अकाऊंट काढले आहे. त्यावर 8 कोटींचे व्यवहार झाले आहेत अशी माहिती देत मोबाईलवरील संशयिताने सीबीआयला फोन कनेक्ट करतो असे सांगितले. त्यानंतर चालू फोनमध्येच प्रदीप सिंग याने सीबीआय ऑफिसर बोलत असल्याचे सांगितले.
मालोजीराव पवार यांना सीबीआयचा तोतया अधिकारी प्रदीप सिंग म्हणाला, संदीप कुमार याच्या घरी आम्ही छापा घातला आहे. त्याच्याकडे 180 पासबुक, कॅश, एटीएम कार्ड, चेकबुक, डेबीट कार्ड मिळून आलेले आहेत. त्याने संदीप कुमार याचा तक्रारदार पवार यांच्या व्हॉटसॲपवर फोटो पाठवला. त्यानंतर प्रदीप सिंग मालोजीराव पवार यांना आपल्यामध्ये जे आत्ता झालेले बोलणे आहे ते कोणलाही सांगायचे नाही. तुम्ही कोणाला सांगितलेस तुम्हाला अटक होईल असे म्हणून धमकी दिली. या सर्व संभाषणामुळे तक्रारदार मालोजीराव पवार घाबरले.
पवार घाबरल्याचे लक्षात येताच संशयितांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन फोन करुन त्यांच्ाकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार मालोजीराव पवार यांनी संशयितांच्या खात्यावर 1 कोटी 39 लाख रुपये पाठवले. संशयित आणखी पैसे मागत होते. मात्र त्यांनी पैसे देणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सातारा सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
व्हिडीओ कॉलद्वारे वॉच...
सायबर चोरट्यांनी मालोजीराव पवार यांना फोनवरून व्हिडीओ, ऑडिओ कॉल करून व्हॉटस्ॲपवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडील काही पत्रे तसेच सुप्रीम कोर्ट ऑर्डर पाठवून अटक होण्याची भीती दाखवली. या भीतीपोटी त्यांनी पैसे पाठवले. तसेच दोघे अनोळखी सायबर चोरटे त्यांच्याशी व्हॉटस् ॲपद्वारे संपर्क ठेवून त्यांच्यावर वॉच ठेवत होते.