खंडाळा : पुढारी वृत्तसेवा
पारगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून जाणार्या धोम- बलकवडी कालव्याच्या पोटपाटाला रविवारी भगदाड पडले. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. तसेच हे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान झाले. खंडाळा तालुक्यातून धोम- बलकवडी कालवा जातो. या कालव्याला जोडून तालुक्यातील असवली खिंडीतून अजनूज, पारगाव येथून 11 नंबरचा पोटकालवा डोंगराकडेने महामार्गाच्या दिशेने प्रवाही होता. शुक्रवारपासून सुरू असणारा मुसळधार पाऊस आणि भराव खचून शेरी नावाच्या शिवारातील पोटपाटाचा भराव खचून भगदाड पडले. या पोटकालव्यातून पाणी सुरु होते, तो फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. शिवारातील सखल भागात पाणी साठले, तर नजीक असणार्या ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याचे पाहायला मिळाले. हा कालवा फुटल्याने काही शेतकर्यांचे नुकसानही झाले.
पोटकालवा फुटला त्या ठिकाणीच यापूर्वीही भगदाड पडले होते. हा पोटकालवा असवली खिंडीतून डोंगराच्या बाजूने अजनूज, पारगांव शिवारातून महामार्ग ओलांडताना बावडा हद्दीत भूमिगत पाईपलाईनद्वारे जातो. मात्र, फुटलेल्या ठिकाणापासून पुढे जाताना पुरेसा उतार न राखल्याने या ठिकाणी पाण्याचा फुगवटा निर्माण होतो. गेले दोन दिवस कोसळणारा मुसळधार पाऊस, कालव्यातून पूर्ण क्षमतेने वाहणारे पाणी, त्यात डोंगर उतारावरून पावसाचे वाहणारे पाणी यामुळे भराव खचून पोट कालव्यास भगदाड पडले.