

ढेबेवाडी : आरक्षण जाहीर झाल्यानंतर कराड तालुक्यातील विंग जिल्हा परिषद गटात अनेक इच्छुकांच्या महत्त्वकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत. हा जिल्हा परिषद गट इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे यंदा नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचवेळी विंग गण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी तर कोळे गण खुला राहिला असल्याने या दोन्ही ठिकाणी उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पहावयास मिळत आहे.
विंग जिल्हा परिषद गट काँग्रेसचा बालेकिल्ला होता हा आता इतिहास झाला आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला झटका बसला असून भाजपाचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुसंडी मारत आमदारकी खेचून आणली आहे. आमदार डॉ. अतुलाबाबांच्या रूपाने विधानसभेला नवा, तरुण चेहरा मिळाला आहे. माजी मंत्री स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांचे सन 1980 पासून सन 2014 पर्यंत सलग 35 वर्षे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होते. या जिल्हा परिषद गटात काँग्रेसचाच विजय ही काळ्या दगडावरची रेघ मानली जात होती. सन 2014 साली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले आणि त्यांनी पुन्हा सन 2019 साली त्यांनी विजय मिळवून सलग 10 वर्षे या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले हेोते.
सन 2024 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्योत्तर 75 वर्षापेक्षा जास्त कालावधीत कराड दक्षिण काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि तसाच हा जिल्हा परिषद गटही होता. मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाने काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र समोर आले आहे. माजी मंत्री विलासराव पाटील यांच्या निधनानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अँड. उदयसिंह पाटील यांनी चांगली साथ दिली होती. मात्र आता ॲड. उदयसिंह पाटील राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्ष प्रवेश केला असल्याने काँग्रेसची या जिल्हा परिषद गटातील अवस्था अधिकच बिकट झाली आहे. त्यातच माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांनी भाजपाची वाट धरल्याने अडचणी वाढल्याच आहेत.
स्व. विलासराव पाटील यांनी स्थापन रयत संघटना आजही प्रभावी असून ही संघटना ॲड. उदयसिंह पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे विंग गट व दोन्ही गणात परंपरागत राजकीय विरोधक असलेले उंडाळकर गट व आमदार डॉ. अतुल भोसले गट म्हणजेच भाजप विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार संघर्ष पहावयास मिळणार आहे. दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरू झाली आहे. त्याचवेळी काँग्रेसकडून उमेदवार रिंगणात उतरविण्यात आल्यास मतविभाजन निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत भाजपाशी संघर्ष केल्यास चुरशीची टक्कर होणार आहे. कराड दक्षिणेत भाजपची ताकद वाढली आहे, तशीच या विंग जिल्हा परिषद गटातही वाढली आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जनसंपर्क सध्या कमी झाला आहे. परिणामी काँग्रेस कार्यकर्त्याना भविष्य अंधःकारमय दिसायला लागल्याने अनेकांनी अन्य पक्षात प्रवेश केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांच्यासह काँग्रेसच्या काही शिलेदारांनी भविष्याचा विचार करत काँग्रेस हात सोडून कमळ हाती धरले आहे. ॲड. उदयसिंह पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडल्याने या जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोळे पंचायत समिती गणात सर्वसाधारण पुरूष आरक्षण जाहीर झाल्याने उमेदवारीसाठी मोठी चुरस पहायला मिळू शकते. विंग गटात मात्र ओबीसी महिला तर विंग पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने भाजपविरूध्द राष्ट्रवादी उमेदवारात सरळ सामना होण्याची शक्यता आहेच. यापूर्वी उंडाळकराचे नेतृत्व माननारे कै. दिनकरराव खबाले, सौ. विजयाताई माने, सौ. पुष्पाताई महिपाल, येरवळेचे सर्जेराव लोकरे, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांया नेतृत्वात शंकरराव खबाले असे उमेदवार जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. काळानुरूप येत्या निवडणुकीत या घराण्यातीलच महिलांना किंवा नव्या दमाच्या तरूण रक्तालाही संधी मिळू शकते. विंग गणात येरवळे, विंग, शिंदेवाडी, घारेवाडी, पोतले, येणके, आणे या गावांचा समावेश आहे.तर कोळे गणात कोळेसह शिंगणवाडी, अंबवडे, कोळेवाडी, कुसूर, तारूख, कोळेवाडी, बामणवाडी, पवारवाडी, वानरवाडी या गावांचा समावेश आहे. एकूणच स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेसच्या अस्तित्वाची ही निवडणूक असली तरी भाजपा आणि राष्ट्रवादीतच खरी लढाई असल्याचे मानले जात आहे.