Satara Development : अजिंक्यतारा, ताराराणी समाधी संवर्धनासाठी 268 कोटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून घोषणा : जीर्णोद्धाराला गती
Satara Development
अजिंक्यतारा, ताराराणी समाधी संवर्धनासाठी 268 कोटी
Published on
Updated on

सातारा : राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ले, धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा जतन करून त्यांना जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने सोमवारी मोठा निर्णय घेतला. सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा जतन व संवर्धनासाठी 134.80 कोटी रुपये, तर संगम माहुली समाधी स्थळ संवर्धन प्रकल्पासाठी 133 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या निधीबाबतची घोषणा मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.

दै. ‌‘पुढारी‌’ने गेली काही वर्षे सातत्याने या विषयावर आवाज उठवला आहे. यासंदर्भात सोमवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विविध तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांबाबत सोमवारी शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सहा महत्त्वाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना एकूण 993.72 कोटी रुपयांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. धनंजय मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील गड-किल्ले हे राज्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक असून, त्यांचे जतन आणि संवर्धन ही शासनाची प्राथमिकता आहे. या स्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असल्याने त्यांच्यासाठी अत्याधुनिक सुविधा, सुरक्षितता, आरोग्य सेवा आणि पर्यटनपूरक सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

सातारा शहराच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा परिसराचा सर्वंकष विकास करण्यात येणार आहे. यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 134.80 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यात विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. या आराखड्यात किल्ल्याचे जतन व संवर्धन, बुरुजांचे पुनरुज्जीवन, राजसदरेचे संवर्धन, अत्याधुनिक लटकता पूल, पर्यटनासाठी आकर्षक स्थळांची निर्मिती, प्रेक्षागॅलरी, नवीन पादचारी मार्ग, लँडस्केपिंग, स्वच्छता व विश्रांतीगृहे आणि पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा यांचा समावेश आहे. सर्व कामे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या.

सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या संगम माहुली समाधीस्थळ संवर्धन प्रकल्पासाठी 133 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार करण्यात येणार असून, परिसराचा लँडस्केप विकासही केला जाणार आहे. याशिवाय ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर व घाटाचे संवर्धन, नवीन हँगिंग ब्रिज, व्ह्यूईंग गॅलरी, सुसज्ज पाथवे आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे संगम माहुली परिसराला धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या नवी ओळख मिळणार असून, जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून हा परिसर विकसित करण्यात येणार असल्याची माहिती ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. दरम्यान, यावेळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी किल्ले अजिंक्यतारा जतन व संवर्धन आराखडा तसेच संगम माहुली समाधी स्थळ संवर्धन आराखड्याचे उत्तम सादरीकरण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news