

खटाव/खंडाळा : वळवाच्या पावसाने मंगळवारी खटाव, खंडाळा, कोरेगाव व वाई तालुक्यात थैमान घातले. अचानक आलेल्या पावसाने बळीराजाची धांदल उडाली. गहू, ज्वारीच्या सुगीवर पावसाने पाणी फिरवल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले. खटाव तालुक्यातील औंध, खटाव, अंभेरी, चौकीचा आंबा परिसरात विजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह वळवाच्या पावसाने थैमान घातले. पुसेगाव, वडूजलाही पावसाच्या सरी बरसल्या.
हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे खटाव तालुक्यात मंगळवारी सकाळपासूनच हवेतील दमटपणा वाढला होता. पहाटे साडेतीन वाजता रिमझिम पाऊस झाला होता. सायंकाळी साडेसहानंतर आकाशात काळे ढग जमले. वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह तालुक्याच्या बहुतांश भागात वळीवाच्या कमी अधिक पावसाने हजेरी लावली.
औंध, चौकीचा आंबा, अंभेरी परिसरात जोरदार पाऊस झाला. औंधच्या आठवडा बाजारात पावसामुळे व्यावसायिक आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. खटावमध्येही आठवडा बाजारात मध्यम पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची पळापळ झाली. पुसेगाव, वडूज परिसरातही वळीवाने हजेरी लावली. रात्री उशीरापर्यंत वीजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु होता. तालुक्याच्या उत्तर भागात रात्री आठनंतर पावसाला सुरुवात झाली. खटाव परिसरातही रात्री उशीरापर्यंत दमदार पाऊस सुरु होता. अचानक आलेल्या पावसाने गहू, ज्वारीच्या सुगीत व्यस्त असलेल्या शेतकर्यांची धांदल उडाली.