

सातारा/कोरेगाव : जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवार, दि. 20 रोजी जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ना. एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार असून यावेळी जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. धार्मिक, संघटनात्मक आणि राजकीय अशा तिन्ही अंगांनी हा दौरा महत्त्वपूर्ण असल्याचे कणसे म्हणाले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख हणमंतराव जगदाळे, शेतकरी संघटनेचे शंकरराव गोडसे, माजी नगराध्यक्ष प्रशांत ऊर्फ राजाभाऊ बर्गे उपस्थित होते. तीर्थक्षेत्र अंगापूर येथील स्वयंभू व नवसाला पावणारा आत्मगजानन म्हणून वेगळी ओळख असणाऱ्या अंगापूर गावाला ‘ब’ पर्यटन क्षेत्र दर्जा ना. एकनाथ शिंदे यांच्यामुळे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नामुळे मिळाला आहे. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार अंगापूर येथे होणार आहे. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक होणार असून त्यानंतर ते गांधी मैदान, राजवाडा येथे होणाऱ्या जाहीर सभास्थळी दाखल होणार आहेत.
यावेळी ना. उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, सहसंपर्क प्रमुख हनुमंत जगदाळे, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, सातारा जि. प. चे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, महिला आघाडी संपर्कप्रमुख रेश्माताई जगताप, जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, जयवंतराव शेलार, चंद्रकांत जाधव उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या निवडून आलेल्या 15 व 30 पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा होणार असल्याचे कणसे यांनी सांगितले.
हणमंतराव जगदाळे म्हणाले, गावोगावी शिवसेना शाखा स्थापन करून पक्ष संघटना मजबूत केली जाईल. साताऱ्यातील जाहीर सभा ही पश्चिम महाराष्ट्रातील विक्रमी ठरेल. दरम्यान, जिल्ह्यात शिवसेनेची गगनभरारी चालू झाली आहे. जिल्ह्यात शिवसेना वाढू लागली असून शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी इथून पुढच्या काळातील आदर्श वाटचाल करण्यासाठी ऐतिहासिक गांधी मैदानावरील ही सभा एक मोठी पर्वणी ठरणार असल्याचे मत जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी व्यक्त केले.
राजाभाऊ बर्गे हाती घेणार शिवधनुष्य
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष केंद्रित केले असून तब्बल 2200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळेच कोरेगावातील अनेक मान्यवर शिवसेना प्रवेशासाठी इच्छुक आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा झाली असून कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले.