

सातारा : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते. राज्यात नॅशनल ऑफ हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून 11 हजार ते 20 हजार हेक्टरवर फुलशेती केली जाते. फुलशेतीच्या माध्यमातून 2 हजार कोटींचा व्यवसाय होता. परंतु, गेल्या काही काळापासून प्लास्टिकच्या फुलांची आयात आणि निर्मिती वाढली आहे. त्यामुळे फुलशेती धोक्यात आली आहे. कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या फुलांची निर्मिती व आयातीवर सरकारने बंदी घालावी, अशी लक्षवेधी कोरेगावचे आ. महेश शिंदे यांनी विधानसभेत मांडली.
यावेळी आ. महेश शिंदे म्हणाले, राज्यात फुलशेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचे अर्थकारण चांगल्या प्रकारे सुरू असताना, राज्यात प्लास्टिकची फुले आयात करण्यात आली. त्यामुळे शेतकर्यांसमोर फार मोठे आर्थिक संकटे उभे राहिले आहे. सरकारच्या या धोरणामुळे सगळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकर्यांवर 50 लाख कर्ज असताना, मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची फुले येतात. ही फुले रिसायकल प्लास्टिकपासून तयार केलेली असतात. त्यात आकर्षक रंग भरले जातात. ते मेटॉनिक ऑक्साईडपासून केले जातात. या फुलांमध्ये मेटल ऑक्साईडचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अमेरिकेतील संस्थेनेसुद्धा अशा प्रकारच्या फुलांमुळे रक्ताचा किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो, असे सांगितले आहे.
आपल्याकडे अलीकडे लग्न समारंभामध्ये तसेच विविध कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकच्या फुलांची सजावट करण्याचे प्रमाण वाढले आहे. या फुलांच्या सान्निध्यात येणार्या नागरिकांच्या रक्तात ऑक्साईडमधील घटक जाऊ शकतात आणि त्यांना रक्ताचा, फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. या फुलांवर परदेशात बंदी असताना आपल्याकडे त्याला आयात का केले जाते? यामुळे शेतकर्यांचे नुकसान होण्याबरोबरच सामान्य माणसांच्या आरोग्यांवरही परिणाम होत आहे. त्याचबरोबर फुलशेतीमधून मधमाश्या पालनही केले जाते. त्यामुळे परागीकरण होते आणि बायोडायव्हर्सिटी संरक्षण होते. परंतु, फुलशेतीच नष्ट झाली तर कृत्रिम परागीकरण करायला लागेल. त्या कृत्रिम परागीकरणच्या माध्यमातून पुन्हा केमिकलाचा प्रसार होणार त्यामुळे पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता वाढणार. त्यामुळे सरकारने तातडीने प्लास्टिक फुले आयात आणि निर्मितीवर तातडीने बंदी घालून शेतकर्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आ. शिंदे यांनी केली.