

तारळे : मुलाच्या डोक्यावर अक्षदा पडल्या, नातवांना मांडीवर खेळवले, की आम्ही डोळे मिटायला मोकळे अशी माफक अपेक्षा पूर्वी पालकांची होती. सरासरी मुला-मुलींचा जन्मदर जवळपास समान होता. अपेक्षांचे ओझे कमी होते. पण मुलगाच पाहिजे या हट्टापाई मुलगी नकोशी झाली. स्त्री भ्रूण हत्या करण्यात आल्या. मुलींचे प्रमाण कमी झाले. त्याचे दुष्परिणाम आताच्या पिढीला भोगावे लागत आहेत.
शेतकरी, छोटे व्यावसायिक, कामगार यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतकर्यांच्या मुलांना याचे चटके मोठ्या प्रमाणावर बसत आहेत. सर्वजण नोकरीच्या पाठीमागे लागले आणी शेतकर्यांच्या मुलांनी लग्नासाठी शेतीकडे दुर्लक्ष केले तर शेतीतून उत्पन्न निघणार कसे व शेतीचे भविष्य काय असेल ही चिंतेची बाब आहे. त्यावर पर्याय काढण्यासाठी समाज व्यवस्था सपशेल अपयशी ठरली आहे.
काही वर्षांपूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी अशी संकल्पना होती. पण काळाच्या ओघात प्रचंड उलथा पालथ होत गेली. आपल्या हट्टपाई व वंशाच्या दिव्यासाठी मुलींच्या पणत्या विझवत त्यांच्या जन्मावरच घाला घातला गेला. सोई सुविधा झाल्याने मुली शिकून मोठ्या झाल्या. सहाजिकच जोडीदाराबाबत त्यांच्या अपेक्षाही बदलत गेल्या.पूर्वी तिसर्या स्थानावर असणारी नोकरी पहिल्या स्थानावर आली. शेती व शेतकरी अडगळीत पडले हे लक्षातही आले नाही. यातच चित्रपट, टीव्ही, मालिका यामधून शेती व शेतकरी यांच्याबाबत विदारक चित्र निर्माण केले गेले. अवकाळी, दुष्काळी यामुळे शेती म्हणजे कायम पिचलेला व शेती हा तोट्यातील व्यवसाय आहे हे समाजमनावर बिंबवले गेले. शासन पातळीवर अनेक सोई -सुविधा शेतकर्यांना देऊ केल्या. पण समाजमध्यमातून शेतीबाबत उभे केलेले चित्र काही बदलले नाही. यामुळे शेती म्हणजे आतबट्ट्यातला धंदा अशीच लोकांची धारणा बनली.
शेतकर्यांचे असंख्य प्रश्न आहेत. ते लोकांपर्यंत, शासनापर्यंत पोहचलेच पाहिजेत. पण शेतकरी हा कायम पिचलेला आहे असा बागुलबुवा निर्माण केला जातो. काही मूठभर शेतकर्यांची ही अवस्था असेलही. पण कमी शेतीत चांगले उत्पादन काढणारे व चांगले जीवन जगणारे अनेक शेतकरी व त्यांची मुले आज समाजात आहेत. पण अशा प्रगतशील व सक्षम शेतकर्यांनाही मुलीच्या कुटुंबियांकडून नकार दिला जातो. टीव्ही, सिनेमा, मालिकांच्या माध्यमातून दाखवली जाणारी जोडपी, त्यांचे जीवन, वागणूक, पैशाची उधळपट्टी, ऐशोआराम, मोठे घर, चार चाकी गाडी असे चित्र निर्माण केले गेले. याच स्वप्नात अनेकजण रमून जातात. पण या फक्त पडद्यावर दाखवायच्या गोष्टी असतात. आभासी जगासारखे जगण्यासाठी आज काल मुलींकडून नोकरदार मुलांनाच पसंती दिली जात आहे.