

तळमावले : मे महिन्यापासून पाऊस धुमाकूळ घालत आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार मे महिन्यात कधी ऐवढा पाऊस झालेला नाही. त्याला लागूनच मान्सून सुरू झाला. त्यामुळे खरीप पेरणीसाठी शेतकर्यांना उसंतच मिळाली नाही. जुलैमध्येही पावसाचा जोर आहेच. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. या पाण्यामुळे ज्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे ती पिके कुजू लागली आहेत.
पाटण तालुक्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक शेतकर्यांना पेरणीपूर्व मशागती करता आल्या नाहीत. जून महिन्यात देखील पावसाने उसंत दिली नाही. जुलै महिन्यात पाऊस कोसळतच आहे. यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पाटण तालुक्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक शेतकर्यांनी अद्यापही पेरणी केलेले नाही. ज्या शेतकर्यांनी पेरणी केली आहे, त्यांची पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. खरेतर पाटण तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधी आणि विरोधक हे दोघेही सत्ताधारी पक्षात आहेत. त्यामुळे ना. शंभुराज देसाई आणि भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
पाटण तालुक्यामध्ये पर्जन्यमानाचे प्रमाण जास्त आहे. त्यातच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्याला जोडूनच वेळेपूर्वी मान्सून दाखल झाला. पावसाने उघडीप दिली नाही. शेतकर्यांना पेरण्या करताना अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे खरीपाच्या अपेक्षित पेरण्या होऊ शकल्या नाहीत. नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने मदतीसाठी अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. शेतीपूरक व पीक कर्ज थकीत असणार्या शेतकर्यांच्या पाठीमागे बँकांनी तगादा लावला आहे. पेरण्या करू न शकलेल्या शेतकर्यांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे झाली आहे. निसर्ग कोपला आहे आणि सरकार लक्ष देत नाही तर आम्ही जगायचं कसे असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.
पाटण तालुका दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. प्रतिकूल परिस्थितीत काही लोक जीवन जगत आहेत. शेती एकमेव उत्पन्नाचे साधन असणार्या शेतकर्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. कोरडवाहू शेतकर्यांच्या बरोबर बागायती शेतकर्यांना देखील मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. बरेचसे ऊस बागायतदार शेतकरी मे महिन्यात ऊस फोडणे तसेच खते टाकणे ही कामे उरकून घेतात. मात्र मे महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही सर्व कामे ठप्प होती. पेरणी न झाल्याने खरीपाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. ज्या भागात पेरणी झाली आहे. तेथे पावसामुळे पिके कुजू लागली आहेत. शेतकर्यांच्या पाठीमागे कर्ज परतफेड व नुतनीकरण संदर्भात राष्ट्रीयीकृत बँकांनी तगादा लावला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.