

सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा परिसरामध्ये चोरट्यांनी महामार्गाच्या प्रॉपर्टीवर दरोडा टाकलेला आहे. दिवसाढवळ्या सेवा रस्त्यालगतच्या संरक्षक जाळ्या लुटून नेल्या असल्या, तरी महामार्ग प्राधिकरणाची देखभाल दुरुस्ती करणारी यंत्रणा आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय, असा कारभार करत आहेत.
या महामार्गावर दिवस रात्र वाहतूक सुरू असूनदेखील संरक्षक जाळ्या चोरून नेल्या आहेत. चोरट्यांनी गटारावरील झाकणेही सोडली नाहीत. या खोल गटारांवर आता झाकणे नसल्याने गंभीर अपघाताचा धोका जागोजागी निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी असलेल्या बायपास मार्गांमध्ये तर नरकासारखी स्थिती आहे. लोक या ठिकाणी कचरा आणून टाकतात.
रस्त्याकडेलाही जागोजागी लोकांनी उकिरडे तयार केले आहेत. हे उकिरडे उचलले जात नाहीत. त्यावर भटकी कुत्री ताव मारत आहेत. तसेच हीच कुत्री मुख्य रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळाही करतात. पुण्यापासून साताऱ्यापर्यंत हीच स्थिती आहे.
शेंद्रे ते कराड मार्गावर तर बोरगाव, नागठाणे, निसराळे, अतीत येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सेवा रस्ते उखडून टाकल्याने जागोजागी डबरे आणि मातीचे ढिग लागलेले आहेत. याच रस्त्यावरुन अचानकपणे एखादे स्थानिक वाहन मुख्य रस्त्यावर येत असल्यानेही अपघात होत आहेत. रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांची कटिंगही वेळेत होत नसल्याने ती मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देखभालीच्या नावाने बोंब आहे. जागोजागी सेवा रस्त्यावरुन वाहतूक वळवली असली तरी सेवा रस्त्यापेक्षा मुख्य रस्ता उंच झाल्याने सेवा रस्त्यावरुन मुख्य रस्त्यावर वाहन नेत असताना वाहनांच्या खालचा भाग घासून रेडियटर लिक होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा रस्त्यांमुळे वाहनांचे टायर खराब होत आहेत.
साताऱ्यातून कराडला जायचे झाल्यास दोन तासाच्या वर वेळ जातो. तर कराडात वाहन अडकल्यास कोल्हापूरला जाण्यासाठी पाच ते सहा तास लागत आहेत. या परिस्थितीमध्ये पुणे ते सातारा व शेंद्रे ते पेठनाका दरम्यान वाहनचालकांचा कोंडमारा होताना पहायला मिळतो. सरकार काय केवळ टोलवसुलीसाठीच आहे का? असा उद्विग्न सवाल वाहनचालककरत आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी डिव्हायडर फोडण्यात आले आहेत. महामार्गालगतच्या व्यावसायिकांनी त्यांच्या सोयीसाठी डिव्हायडर फोडले असून त्याकडे प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. अशात सेवा रस्त्यांवरुन अचानकपणे वाहने महामार्गावर येत असल्याने गंभीर अपघात होत आहेत.