

कोपर्डे हवेली : कराड - मसूर या जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील कोपर्डे हवेली गावच्या हद्दीत मुख्य मार्गावरच अलिकडच्या काळात नव्याने भरू लागलेल्या भाजी मंडईमुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गावरील पुलावरच भरत असलेली ही मंडई आता जीवघेण्या अपघातांना निमंत्रण देत असल्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
कोपर्डे हवेली गावच्या हद्दीत श्री स्वामी समर्थ केंद्र असून हे केंद्र परिसरातील हजारो नागरिकांचे श्रद्धास्थान बनले आहे. दररोज मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. भक्तांची वाढती वर्दळ पाहून भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ताजा भाजीपाला ओढ्याच्या पुलावर बसून विक्रीस सुरुवात केली. हळूहळू त्याचे रूपांतर मोठ्या भाजी मंडईत झाले असून शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांनीही येथे दुकाने थाटली आहेत. दररोज संध्याकाळी दर्शनासाठी येणारे भाविक जाताना भाजीपाला खरेदी करत असल्याने येथे मोठी गर्दी होत आहे. मात्र हा प्रमुख दळणवळणाचा मार्ग असल्याने हजारो वाहनांची सतत ये-जा सुरू असते. यासोबतच साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीची जड वाहनेही मोठ्या प्रमाणात धावत असतात. पुलावरच भाजी मंडई भरत असल्याने ग्राहकांची रस्त्यावरून सततची ये-जा, विक्रेत्यांची गर्दी आणि वाहतुकीचा वेग यामुळे छोटे-मोठे अपघात घडू लागले आहेत. श्रद्धास्थानाचा परिसर मृत्युचा सापळा ठरू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
कराड - मसूर मार्ग हा जिल्ह्यातील कराडसह कोरेगाव, खटाव, माण, सातारा या तालुक्यांना जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे. मुळातच हा मार्ग अरूंद असून या मार्गावरील दळणवळण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अनेकदा तासवडे टोलनाका चुकविण्यासाठी अवजड वाहने कराड - मसूर मार्गाचा वापर करतात. त्यामुळेच या मार्गावरील भाजी मंडई पर्यायी जागेवर शिफ्ट करून अपघाताचा धोका कमी करणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे कानाडोळा होत असून भविष्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास कोण जबाबदार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.