

तुषार देशमुख
सणबूर : एका बाजूला वांग-मराठवाडी धरणाचा विस्तीर्ण जलाशय, दुसर्या बाजूला खोल दरी आणि मध्येच अंगावर काटा आणणारी नागमोडी वळणे... अशा जीवघेण्या परिस्थितीतून मत्रेवाडी घाटातील प्रवाशांचा रोजचा प्रवास सुरू आहे. अरुंद रस्ता, तीव्र उतार आणि धोकादायक वळणांवर संरक्षक कठड्यांचा अभाव यामुळे या मार्गावरून प्रवास करताना अपघाताची भीती सतावत आहे. ढेबेवाडी विभागातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असलेल्या या घाटाची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने रस्ता रुंदीकरण आणि संरक्षक कठडे उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील अनेक दुर्गम गावांना जोडणारा मत्रेवाडी घाट हा परिसराच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. पवारवाडी ते माईंगडेवाडी दरम्यान असलेल्या या घाटातून निवी, कसणी, मेंढ, निगडे, घोटील, माईंगडेवाडी यांसह अनेक गावांतील नागरिकांची नियमित ये-जा सुरू असते. बाजारपेठ, शिक्षण, आरोग्यसेवा तसेच विविध शासकीय आणि खासगी कामांसाठी नागरिकांना याच मार्गाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची सुरक्षितता हा केवळ वाहतुकीचा प्रश्न नसून संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित विषय बनला आहे.
या महत्त्वाच्या मार्गावर आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव जाणवत आहे. घाटातील रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असून, तीव्र उतार आणि एकापाठोपाठ येणार्या धोकादायक वळणांमुळे वाहनचालकांना अत्यंत सावधपणे वाहन चालवावे लागते. समोरून एसटी बस किंवा अन्य मोठे वाहन आल्यास दोन्ही वाहनांना सुरक्षितपणे मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. अशा वेळी वाहनचालकांची थोडीशी चूकही गंभीर अपघाताला निमंत्रण देऊ शकते. विशेष म्हणजे, काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोल दरी आणि धरणाचा जलाशय असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे.
या घाटातून मेंढ आणि तळमावले परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ढेबेवाडी येथे ये-जा करतात. सकाळी शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत आणि दुपारी सुट्टीच्या वेळी या मार्गावर विद्यार्थ्यांची वर्दळ असते. विद्यार्थ्यांसह शिक्षक, नोकरदार, शेतकरी, व्यावसायिक आणि अन्य प्रवाशांनाही याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. एसटी बसेस, वडाप आणि खासगी वाहनांची नियमित वाहतूक सुरू असल्याने घाटातील अरुंद रस्त्यावरील ताण वाढत आहे. मात्र, रस्त्याच्या धोकादायक स्वरूपाच्या तुलनेत सुरक्षेच्या उपाययोजना अपुर्या असल्याने प्रवाशांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर ओलावा, धुके आणि निसरड्या पृष्ठभागामुळे वाहन चालवणे अधिक कठीण होते. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्यास वळणांचा अंदाज घेणेही अवघड ठरू शकते. नवख्या वाहनचालकांसाठी तर हा घाट अधिकच आव्हानात्मक आहे. एका बाजूला खोल दरी आणि दुसर्या बाजूला पाण्याचा मोठा साठा असल्याने प्रत्येक वळणावर विशेष दक्षता घ्यावी लागते. केवळ वाहनचालकांच्या सावधगिरीवर प्रवाशांची सुरक्षितता अवलंबून ठेवणे कितपत योग्य, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संभाव्य दुर्घटनेची जाणीव असूनही वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत, तर भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रवाशाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त प्रश्न उपस्थित करत आहेत.
धरणालगतची वळणे ठरताहेत धोकादायक
मत्रेवाडी घाटातील धरणालगतची वळणे सर्वाधिक चिंतेचा विषय ठरत आहेत. तीव्र उतारावरून वाहन खाली येत असताना अचानक समोरून वाहन आल्यास चालकाची तारांबळ उडते. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवताना किंवा दुसर्या वाहनाला बाजू देताना ताबा सुटण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी मजबूत संरक्षक कठडे नसल्यास वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत किंवा धरणाच्या जलाशयाच्या दिशेने जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या मार्गावरील धोकादायक वळणांवर यापूर्वीही एसटी बसेस आणि चारचाकी वाहनांचे अपघात झाल्याचे सांगितले जाते.