Satara News : आरक्षणामुळे अनेकांचे मनसुबे धुळीस

गोंदवले गट व गणावर संक्रांत : दुहेरी आरक्षणामुळे नेत्यांची कुचंबणा
Satara Zilla Parishad
Satara Zilla Parishad
Published on
Updated on

राजेश इनामदार

दहिवडी : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर झाल्याने निवडणुकीपूर्वीच अनेक मातब्बरांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. सर्वात जास्त म्हणजे गोंदवले गटात व गणात दोन्हीकडेही आरक्षण पडल्याने अनेक नेत्यांना तलवारी म्यान कराव्या लागल्या आहेत. दुहेरी आरक्षणामुळे इच्छुकांची मोठी कुचंबणा झाली आहे. मार्डी, बिदाल आणि आंधळी गट सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने या गटातही इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. तर सभापती पद खुले असल्याने संभाव्य इच्छुक पंचायत समितीची वाट धरणार का? हे पहावे लागणार आहे.

माण तालुक्याचे राजकारण सध्या वेगळ्या टप्प्यावर असून तालुक्यात अनिश्चितता जास्त आहे. भारतीय जनता पार्टीचे आ. जयकुमार गोरे हे आता ग्रामविकास मंत्री झाल्याने त्यांची ताकद प्रत्येक गणात दिसून येत आहे. गावोगावी सुरू असलेली विकास कामे ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे, तर विरोधक नेते असलेले प्रभाकर घार्गे व प्रभाकर देशमुख यांचे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात थांबायचे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जायचे याबाबत संभ्रमावस्था दिसून येत आहे. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने दोन्ही नेत्यांना आता आपल्या भूमिका स्पष्ट कराव्या लागतील. नेत्यांच्या संभ्रमावस्थेमुळे गाव पातळीवर ही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

राज्य पातळीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांची युती आहे. परंतु आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत हा युती धर्म राहणार का? की सर्वत्र मैत्रीपूर्ण लढती होणार हे अजून स्पष्ट नाही. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) व शिवसेना (उभाटा) व अन्य मित्र पक्ष यांची अजून आघाडी झालेली दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाची काय भूमिका राहणार हे पहावे लागणार आहे. त्यातच माण तालुक्याचा विचार करता शेखर गोरे यांनी ना. जयकुमार गोरे यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिला होता. त्यांना भाजपाकडून काही शब्द दिल्याचे बोलले जात आहे. परंतु शेखर गोरे यांचा ठोसपणे भाजपमध्ये प्रवेश नसल्याने त्यांची जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर कुकुडवाड गट खुला झाल्याने अनिल देसाई, अभयसिंह जगताप यांच्या भूमिका काय राहणार हे काही दिवसात स्पष्ट होईल. अभयसिंह जगताप यांनी तर पदवीधर मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे एकमेव खुल्या असलेल्या कुकुडवाड गटात ऐनवेळी कशी लढत होणार हे पहावे लागेल. या गटातून अनिल देसाई, अभयसिंह जगताप, महेंद्र देसाई, अरुण गोरे, चिन्मय कुलकर्णी अशी नावे चर्चेत आहेत. काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय, बसपा व अन्य छोट्या राजकीय पक्षांची भूमिका महत्वपूर्ण असणार आहेत.

गोंदवले गट व गण दोन्ही ही अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव झाले आहेत. गोंदवले गटात पिंपरीचे माजी सरपंच चंद्रकांत शिलवंत, नरवणेचे उपसरपंच रवी तुपे, पळशीचे माजी सरपंच शंकर देवकुळे, दिवडचे माजी सरपंच सयाजी लोखंडे यांच्या घरातील महिला उमेदवार यांना संधी मिळू शकते. गोंदवले गटाचे आरक्षण राखीव पडल्याने गटाचे नेते पळशीचे डॉ.राजेंद्र खाडे, गोंदवलेचे सरपंच जयप्रकाश कट्टे, विष्णुपंत कट्टे, अंगराज कट्टे, लोधावडेचे सरपंच राजेंद्र देशमुख, संतोष कट्टे यांच्यासह अनेकांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. डॉ. संदीप पोळ यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने गोंदवले गटातून जरी त्यांची संधी हुकली असली तरी मार्डी गटातून सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने त्यांच्या पत्नी विद्यमान जिल्हा परिषद सदस्या भारती पोळ यांना उमेवारीची पुन्हा संधी आहे. तसेच भाजपमधून राजू पोळ यांच्या पत्नी व माजी पंचायत समिती सदस्या शीला पोळ, नानासाहेब डोलताडे यांच्या घरातील महिला उमेदवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज पोळ यांच्या पत्नी विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सोनाली पोळ यांना उमेदवारीची संधी उपलब्ध झाली आहे. वरकुटे-म्हसवड गणातून माजी. जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, बबन वीरकर तसेच ज्येष्ठ नेते माजी सभापती श्रीराम पाटील, भाटकीचे माजी पंचायत समिती सदस्य गोरख शिर्के यांच्यासह अनेक संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पळशी गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असून या गणातून भाजपकडून डॉ. राजेंद्र खाडे, धामणीचे सुभाष खाडे, अ‍ॅड. दत्तात्रय हांगे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब काळे, नितीन राजगे, मानसिंगराव खाडे यांच्यासह अनेक संभाव्य उमेदवार असू शकतात.

बिदाल गट व गण दोन्हीही महिलांसाठी राखीव असून भाजपकडून पांगरीचे नेते डॉ. अजित दडस यांच्या पत्नी सावित्रा दडस, भाजपचे नेते व माजी सभापती रंजना जगदाळे, अपर्णा भोसले यांना दोन्हीकडे संधी उपलब्ध झाली आहे. बिजवडीचे उपसरपंच अमित भोसले यांच्या पत्नी प्रतिमा भोसले यांच्यासह अनेक संभाव्य उमेदवार असू शकतात. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तानाजी मगर, सुरेश जगदाळे, एम. के. भोसले, ज्येष्ठ नेते पिंटू जगदाळे यांच्या घरातील महिला संभाव्य उमेदवार असू शकतात. मामुशेठ वीरकर यांची भूमिकाही या गटात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

वावरहिरे गण खुला असून भाजपकडून ज्येष्ठ नेते हरिभाऊ जगदाळे, सतीश जगदाळे, बाबासाहेब हुलगे, विनोद बोराटे, राजाराम बोराटे, विठ्ठलबापू जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वावरहिरे सरपंच शामराव राऊत, वीरभद्र कावडे यांच्यासह अनेक संभाव्य उमेदवार असू शकतात. कुकुटवाड गट व गण दोन्ही खुला असल्याने भाजपकडून या गटातील बड्या नेत्यांना टक्कर देण्यासाठी ना. जयकुमार गोरे हे अरुण गोरे यांना कुकुडवाड गटात जाऊन लढायला लावतील, अशा चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभयसिंह जगताप व अनिल देसाई, महेंद्र देसाई यासह अनेक संभाव्य उमेदवार असू शकतात. कुकुडवाड गण खुला असल्याने या गणातून चिन्मय कुलकर्णी, उत्तम काटकर, अन्य काटकर कंपनी तसेच राष्ट्रवादीकडून देवापूरचे सरपंच शहाजी बाबर यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news