Dahiwadi politics: दहिवडीत नाट्यमय घडामोडी; भाजपचा नगराध्यक्ष निश्चित

दोघांची माघार
Dahiwadi politics: दहिवडीत नाट्यमय घडामोडी; भाजपचा नगराध्यक्ष निश्चित
Published on
Updated on

दहिवडी : दहिवडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन उमेदवारांनी नाट्यमयरीत्या माघार घेतल्याने भारतीय जनता पार्टीच्या वर्षाराणी बाळासाहेब सावंत यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली असून शुक्रवारी त्याची अधिकृत घोषणा होणार आहे.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून वर्षाराणी सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध भाजपचेच महेश जाधव यांनी दुसरा अर्ज दाखल केला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नगरसेवक सुरेंद्र मोरे यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला होता. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अचानक रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. भाजपकडे पाच नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले तीन असे एकूण आठ नगरसेवक होते. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आणखी एका सदस्याची गरज होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाच सदस्य होते, तर शेखर गोरे यांच्या गटाकडे चार सदस्य असल्याने गोरे गटाची भूमिका ‌‘किंगमेकर‌’ ठरणार अशी चर्चा सुरू झाली होती.

गोरे गटाचे चार नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील अशी शक्यता व्यक्त होताच दहिवडीतील राजकीय घडामोडींना वेग आला. अनेक नगरसेवक ‌‘आऊट ऑफ कव्हरेज‌’ झाल्याने राजकीय वातावरणात तणाव आणि उत्सुकता वाढली. मात्र राजकारणात शेवटचा डाव कोणाचा बसतो हे सांगणे कठीण असते. ऐनवेळी भाजपचे नेते शेखर गोरे यांनी आपले चारही नगरसेवक भाजपच्या पारड्यात टाकण्याचा निर्णय घेतल्याने समीकरणे एका क्षणात बदलली. त्यामुळे भाजपचे संख्याबळ थेट बारापर्यंत पोहोचले आणि निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले.

गोरे गटाची साथ मिळणार नाही हे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याचबरोबर भाजपचे दुसरे उमेदवार महेश जाधव यांनीही आपला डमी अर्ज माघारी घेतला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वर्षाराणी सावंत यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी बारा वाजता दहिवडी नगरपंचायत कार्यालयात पिटासनाधिकारी तथा प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष सभेत नगराध्यक्ष पदाच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news