

दहिवडी : भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार व प्रभाकर देशमुख यांचे कॉल असून गोरेंना बदनाम करण्यात यांचे षडयंत्र असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. त्यानुसार सातारा पोलिस दलातील अधिकार्यांनी प्रभाकर देशमुख यांच्या पुणे येथील घरी जावून त्यांच्याशी संबंधित एकाकडे चौकशी केली. यावेळी प्रभाकर देशमुख घरी नव्हते. दरम्यान, चौकशीचा हा ससेमिरा पुढेही सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ना. जयकुमार गोरे यांनी गेल्या महिन्यात तुषार खरात याच्याविरुध्द खंडणी मागितल्याची स्वत: तक्रार दिली आहे. त्याचवेळी तुषार खरात याच्यावर वडूज पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. वडूज पोलिसांनी याप्रकरणी खरात यांना अटक केली. दहिवडी पोलिसांचा तपास सुरु असताना गेल्याच आठवड्यात शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या अनिल सुभेदार यांनाही अटक केली आहे. या कारवाईनंतर दहिवडी पोलिसांनी आणखी कारवाईचा ससेमिरा सुरू ठेवत गुरुवारी थेट निवृत्त सनदी अधिकारी व जयकुमार गोरे यांचे राजकीय विरोधक प्रभाकर देेशमुख यांचे पुणे येथील निवासस्थान गाठले.
म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनावणे हे ना. जयकुमार गोरे यांनी दिलेल्या तक्रारीचे तपासी अधिकारी आहेत. गुरुवारी ते पोलिस पथकासह प्रभाकर देशमुख यांच्या निवासस्थानी गेले. तेथे प्रभाकर देशमुख उपस्थित नव्हते. मात्र तरीही दहिवडी पोलिस सुमारे दोन तास तेथे तळ ठोकून होते. प्रभाकर देशमुख यांच्या संबंधित असलेल्या एकाकडे तेथेच निवासस्थानी चौकशी केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर दहिवडी पोलिस तेथून निघून गेले. दरम्यान, दहिवडी पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, या सर्व प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशनात देखील उमटले होते. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात गौप्यस्फोट केले. त्यात या प्रकरणात खा. सुप्रिया सुळे, आ. रोहित पवार व प्रभाकर देशमुख यांचे शंभरपेक्षा जास्त कॉल झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला. एवढेच नाही तर गोरेंना बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते, असेही फडणवीस म्हणाले होते.
प्रभाकर देशमुखांवरील कारवाईबाबत मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, त्या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बर्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्याबाबत आत्ता पोलिस तपास सुरु आहे. त्याबाबत बोलण्याविषयी माझ्याकडे खूप काही आहे पण मी आता बोलणार नाही. अजून तपास सुरु आहे पोलिसांना त्यांचा तपास करु द्या. त्यामध्ये जे काही आहे ते बाहेर येऊ द्या ते बाहेर आल्यानंतर मी त्या संदर्भात भूमिका मांडेल. आज पोलिस तपास सुरु आहे, त्यांना तपास करु द्या, असेही ना. गोरे म्हणाले.