

सातारा : जीवनात अनेक क्षेत्रांमध्ये युवकांना आपले करिअर निवडण्याची संधी आहे. महाराष्ट्रीयन युवकांना क्रिकेट क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी एक संधी किंवा प्लॅटफार्म उपलब्ध करुन देण्याच्या मुख्य उद्देशाने स्व. दादामहाराज क्रीकेट स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेरणा घेवून अनेक दिग्गज खेळाडू देशाला मिळतील, असे गौरवोद्गार खा. उदयनराजे भोसले यांनी काढले.
छत्रपती शाहू क्रीडा संकूल येथे झालेल्या स्व. दादा महाराज उर्फ प्रतापसिंह महाराज क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेशअण्णा साधले, काका धुमाळ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, जितेंद्र खानविलकर, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व मनोज शेंडे, संग्राम बर्गे, अॅड विनीत पाटील यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू व नागरिक उपस्थित होते.
स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक सुरगणा संस्थान नाशिकचे श्रीमंत यशराजे पवार यांच्या हस्ते करण्यात आली. मयुर क्रिकेट क्लब विरुध्द श्रीदत्त परिवार वाढे, संघ ब यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात मयुर क्रिकेट क्लब विजेता ठरला. यावेळी मयूर क्लबला 3 लाखांचे प्रथम क्रमांचे बक्षीस व चषक खा. उदयनराजेंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर श्री दत्त परिवार या संघाला 2 लाखांचे बक्षीस देण्यात आले. तर उपात्य फेरीपर्यंत मजल मारलेल्या जनाई-मळाई क्रिकेट क्लब आणि सचिन आप्पा साळुंखे मित्रसमुह या दोन संघांना 1 लाखांचे बक्षीस विभागून देण्यात आले. या स्पर्धेत 90 क्रिकेट संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पंच म्हणून ईशाद बागवान, मयुर कांबळे, जावेद सय्यद, अमित पोतेकर, अजित पोतेकर, प्रफुल्ल देखणे यांनी काम पाहिले. स्कोअरर म्हणून चंद्रमणी बनसोडे यांनी काम केले.