

साखरवाडी : संपूर्ण राज्यासह देशभरात खळबळ उडवणार्या डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी निलंबित फौजदार गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना फलटण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांचीही 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणातील तपासाची सूत्रे आता एसआयटीकडे गेली असून सायबर तज्ञांकडून डेटाची तपासणी केली जात आहे.
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून विविध पक्षांकडून एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. या प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावा, तसेच सत्य बाहेर यावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या एसआयटीच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एसआयटीमार्फत प्रकरणाचा तपास जलदगतीने आणि सर्वंकष पद्धतीने होईल, अशी माहिती गृहविभागाकडून देण्यात आली आहे.
या प्रकरणातील सर्व संबंधितांच्या चौकशा होऊन सत्य लवकरच उजेडात आणले जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. फलटण पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात आरोपींकडून मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप आणि इतर काही महत्त्वाचे डिजिटल पुरावे हस्तगत केले आहेत. या उपकरणांमधील डेटा तपासण्यासाठी सायबर तज्ञांची मदत घेतली जात असून त्यातून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय, सामाजिक आणि वैद्यकीय वर्तुळात तीव्र संताप आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टर समाजासह विविध संघटनांकडून सखोल चौकशी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आणि एसआयटीने संयुक्त पद्धतीने काम सुरू केले आहे. न्यायालयीन कोठडीत असताना आरोपींकडून मिळणार्या माहितीच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरणार आहे.