

सातारा : ऐन पितृ पंधरवड्यामध्ये ग्रामीण भागात वास्तव्य करणार्या कावळ्यांनी आपला मोर्चा शहरांकडे वळवला आहे. शहरातील स्मशानभूमींमध्ये गावांच्या तुलनेत अधिक सुरक्षितता व खाद्याची सोय होत असल्याने हे चित्र पाहायला मिळत असल्याचे मत पक्षी अभ्यासक व्यक्त करत आहेत.
सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. हिंदू संस्कृतीनुसार या पंधरवड्यामध्ये महाळ घातले जातात. याच पंधरवड्यामध्ये त्रिपिंडी शांती, नारायण नागबली, पिंडदान असे धार्मिक विधी ब्राह्मण तसेच जंगम यांच्याकडून केले जातात. सावडणे विधी, दशक्रिया विधी हे विधी तर नित्यनेमाने होतात. कराड, फलटण, वाई, फलटण या मोठ्या शहरांमध्ये हे विधी सातत्याने सुरु असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये कावळे व इतर पशुपक्ष्यांना खाद्य उपलब्ध होते. याउलट ग्रामीण भागामध्ये स्थिती आहे. ग्रामीण भागातील स्मशानभूमींमध्ये खाद्याची तितकीशी उपलब्ध होत नाही. पितृपंधरवडा वगळता इतर वेळी तेवढ्या प्रमाणात ग्रामीण भागात विधी होत नसल्याने कावळ्यांनी शहरांतील स्मशानभूमी परिसरामध्ये स्थलांतर केल्याचे चित्र आहे.
पिंडदानाच्यावेळी कावळ्याला नैवेद्य दाखवला जातो, कारण पितरांचे लिंगदेह कावळ्याच्या रूपात येऊन पिंडातील अन्न ग्रहण करतात असे मानले जाते. याला ‘काकस्पर्श’ म्हणतात आणि कावळ्याने पिंड शिवल्यास तो नैवेद्य पितरांपर्यंत पोहोचला असे समजले जाते. यामुळे पितृपक्षात पिंडदानाच्या विधीमध्ये कावळ्याला विशेष महत्त्व आहे आणि कावळ्याला बोलवून नैवेद्य दिला जातो.
दरम्यान, यंदा राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भामध्ये ऐन पितृ पंधरवड्यात पिंडाला शिवायला कावळे मिळत नसल्याचे चित्र असले तरी सातारा, कराड या शहरांमध्ये मात्र वेगळी स्थिती पाहायला मिळत आहे. पिंड दानासाठी या परिसरामध्ये कावळ्यांची झुंबड पाहायला मिळते.
पितृपंधरवड्याचे हे आहे महत्त्व
पितरांचे दूत : मृत व्यक्तींचे लिंगदेह पृथ्वीच्या वातावरण कक्षेत प्रवेश करतात आणि ते कावळ्याच्या देहात प्रवेश करून पिंडातील अन्न भक्षण करतात.
नैवेद्य पोहोचण्याची खूण : कावळ्याने पिंड शिवल्यास किंवा नैवेद्य खाल्ल्यास, तो पितरांपर्यंत पोहोचला असे मानले जाते.
पितृपक्षातील महत्त्व : पितृपक्षात कावळ्यांना अन्न देणे हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो. या 15 दिवसांत कावळ्यांना जेवण दिले जाते.
श्रद्धा आणि परंपरेचा भाग : कावळ्याला पिंड शिवणे हे पितरांच्या तृप्तीचे प्रतीक आहे आणि हा एक प्राचीन परंपरेचा भाग आहे.