

लोणंद : महाराष्ट्र वखार महामंडळाच्या लोणंद केंद्रामध्ये लाखों रुपयांच्या गहू व तांदळाची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाली आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे . लाखो किलो गहू व तांदूळ वखार महामंडळाच्या गोदामातून बाहेर जातेच कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धान्याची शेकडो पोती गोदामाबाहेर जात असताना याची खबर कशी लागत नव्हती, यावर शंका व्यक्त केली जात आहे. तेरी भी चुप मेरी भी चुप असे धोरण अवलंबल्यानेच तब्बल आठ वर्ष अपहार केला गेला आहे. धान्याची शेकडो पोती नक्की कुठे गेली? कोणाला विकली गेली? कोणी खरेदी केली? याची चौकशी होण्याची गरज आहे. गरिबांच्या धान्यांवर डल्ला मारणाऱ्या सर्वांनाच कायद्याच्या कचाट्यात घेणे गरजेचे आहे.
लोणंद रेल्वे स्टेशनच्या माल धक्क्यावर रेल्वे वॅगेनद्वारे भारतीय खाद्य निगमकडून तांदुळ व गहू येत असतो. या ठिकाणाहून ट्रकद्वारे लोणंद येथील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये नेण्यात येवून साठवणूक केली जाते. या ठिकाणाहून खंडाळा, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, फलटण आदी तालुक्यात रेशनिंगद्वारे वितरण करण्यासाठी पुरवठा विभागाला देण्यात येत असतो.
लोणंद येथील वखार केंद्राची साठवणूक क्षमता 20 हजार 440 मे.टन आहे. त्यासाठी 14 मोठ मोठाले गोडावून कापडगाव, ता. फलटण गावच्या हद्दीत बांधण्यात आली आहेत. लोणंद (कापडगाव ) येथील वखार केंद्रावर दिनांक 06/06/2016 पासून ते दिनांक 02/12/2024 पर्यंत केंद्र प्रमुख म्हणुन समीर अशोक नाडगौडा (रा. पुणे) हे केंद्र प्रमुख होते. दि. 22/09/2022 रोजी पासुन ते दि. 11/03/2025 पर्यंत वखार महामंडळाने शुभम लॉजिस्टीक प्रा.लि. सांगली यांचेकडे लोणंद केंद्र वर्ग केले होते. त्यानंतर दिनांक 11/03/2025 ते आज पर्यंत लोणंद (कापडगाव) केंद्र हे ओरिगो कोमोडीटीज या कंपनीकडे वर्ग केलेले आहे. या ठिकाणच्या वखार केंद्रावर दफ्तरी नोंदीपेक्षा कमी आढळून आल्या होत्या.
त्यानंतर या वखार केंद्रावर दि. 11/08/2024 व दि. 12/08/2024 रोजी भारतीय खाद्य निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली हेती. या तपासणी अहवालानुसार गहू साठ्यामध्ये 2901 पोती, तसेच तांदळाची 1235 तांदूळ अशी दोन्ही मिळून 4136 पोती कमी आढळून आली. तसेच या गोदामामध्ये 54 पोती तांदूळ व 28 पोती गहू दप्तर नोंद पेक्षा जास्त आढळून आली होती. यावरून समीर नाडगौडा यांच्या कार्यकाळात 87 लाख 76 हजार 903 रूपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत लोणंद पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणंद वखार महामंडळाच्या केंद्रातून सुमारे चार हजारपेक्षा जास्त पोती विनापरवाना बाहेर जातात कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या धान्याच्या रॅकेटमध्ये अनेकजण सहभागी झाले असल्याची शंका व्यक्त केली जात आहेत. धान्याची शेकडो पोती नक्की कोठे गेली. धान्याची पोती कोणाला विकण्यात आली. गरीबांच्या ताटात कोणी कोणी माती कालवण्याचे काम केले याचा शोध घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी सुमारे 15 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी काम करत असताना एवढ्या मोठया अफरातफरीची माहिती कोणालाच कशी लागली नाही, हे न उलगडलेले कोडे आहे.