Satara Accident : मुलीला साेडून येताना दाम्पत्याचा अंत

घरापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर भीषण अपघात
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

खटाव : पुणे येथे इंजिनिअरिंगला असलेल्या मुलीला काॅलेजमध्ये सोडून परत घरी येत असताना झालेल्या भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत दहावीत शिकणारा मुलगाही गंभीर जखमी झाला. विजय बबनराव भोसले (वय ५०), समृद्धी विजय भोसले (४५) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर मुलगा वरद विजय भोसले (१६, तिघे रा. पुसेगाव, ता. खटाव) हा गंभीर जखमी झाला .

सातारा-पंढरपूर महामार्गावर नेर फाटा येथे सोमवारी रात्री दीड वाजता कार व ट्रक यांच्यात हा अपघात झाला. अवघ्या ५०० मीटर अंतरावर घर आले असताना काळाने घाला घातला. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.

विजय व समृद्धी या दाम्पत्याची मुलगी गायत्री (१९) ही पुणे येथे अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. तिला काॅलेजला सोडण्यासाठी हे दाम्पत्य मुलगा वरद सह रविवारी गेले होते. तेथून ते तिघे पुन्हा माघारी (एमएच ११ डीएन ३५८०) या कारमधून घरी येत होते. ते पुसेगावकडे निघाले होते. पहाटे १.३० वाजता नेर फाट्यावरील पेट्रोल पंपाजवळ पुसेगाव बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक (एमएच २५ एजे ९३३४) आणि या कारची धडक झाली. यात भोसले दाम्पत्याचा जागेवरच मृत्यू झाला; तर मुलगा वरद हा जखमी झाला असून, त्याच्यावर सातारा सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी ट्रकचालक समीर बाबू नदाफ (२५ , रा. तुगाव, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विजय भोसले हे येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळात वरिष्ठ क्लार्क म्हणून कार्यरत होते. तर, समृद्धी या गृहिणी होत्या. त्यांच्या अपघाती जाण्याने पुसेगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news