

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेतून काही महिन्यांपूर्वी बदली होऊन दौंड येथे गेलेला सहाय्यक नगररचनाकार विजयकुमार हावशेट्टी (वय 31) याला पेट्रोलपंप उभारणीसाठी आवश्यक परवानगी देण्यासाठी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात एसीबीने गुन्हा दाखल केला. यानंतर हावशेट्टी याच्या महाबळेश्वर येथील कारनाम्यांची चर्चा सुरू झाली आहे.
महाबळेश्वर नगरपालिकेतही हावशेट्टी याच्याविरोधात तक्रारी होत्या. प्रशासकीय काळामध्ये स्वतः च्या मोठ्या आर्थिक फायद्यासाठी अनेक प्रकरणे परस्पर मार्गी लावल्याची चर्चा पालिका वर्तुळामध्ये होती. चार वर्षे ठाण मांडून बसलेला हा युवा अधिकारी राजेशाही थाटात कारभार करत होता. मनमानी कारभार करून मोठा फायदा मिळवायचा असेही बोलले जात आहे.
चार वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडल्याने शहरातील काही लोकांससोबत संबंध जोडत त्याने अनेक उद्योग केले. प्रामुख्याने काही हेरिटेज ग्रेडच्या ब्रिटिशकालीन बंगल्यामधील डागडुजीची कामे देखील हावशेट्टी याच्याच काळात विनापरवाना झाल्याची चर्चा आहे. याचबरोबर अनधिकृत हॉटेल, लॉज बाबत जिल्हाधिकार्यांनी आदेश देऊनही त्याचे पालन न करता आर्थिक तडजोडी केल्याचाही आरोप होत होता. काही बेकायदा हॉटेल्सवर कारवाईबाबत त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात होती. त्याच्या याच कारनाम्यामुळे सहाय्यक नगररचनाकार म्हणून पालिकेत दाखल झालेले हावशेट्टी हे ‘खावशेट्टी’ ओळखले जात होते.
महाबळेश्वर शहरात अनेक उद्योग केलेल्या या अधिकार्याची बदली करावी अशी सर्वप्रथम मागणी माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी संचालक नगररचना आणि जिल्हाधिकार्यांकडे केली होती. तसेच बदली न केल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर संचालक नगररचना यांनी तक्रार अर्जाची दाखल घेत चौकशी करुन विजयकुमार हावशेट्टी याची महाबळेश्वर पालिकेमधून सप्टेंबर 2024 मध्ये बदली केली.