

सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मनोमिलन होऊन समन्वयातून दोन्ही राजेंचे गट निवडणुकीला सामोरे गेले. मात्र, उमेदवारी देताना दुजाभाव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊन मनोमिलनाला तडा गेला.
मनोमिलनातील उमेदवारांविरोधात अपक्षांची उमेदवारी होऊन राजे गटातील कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळेच निकालानंतर दोन्ही राजे गटांतील सुप्त संघर्ष उघड झाला असून, उदयनराजे गटाच्या नगरसेवकांनी एकजुटीने आज पुणे येथे जाऊन खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मनोमिलनामुळे विजयी उमेदवारांची एकत्रित बैठक अपेक्षित असताना उदयनराजे गटाच्या नगरसेवकांची पुणे येथे स्वतंत्र बैठक झाल्याने पदभार स्वीकारण्यापूर्वीच संघर्ष सुरू झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, या बैठकीत नगरसेवकांनी आपल्याविरोधात कुरघोड्या झाल्याची तक्रार उदयनराजेंकडे केली.
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या उदयनराजे गटाच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी पुणे येथे उदयनराजे भोसले यांच्या कोरेगाव पार्कमधील निवासस्थानी पार पडली. यावेळी श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले प्रमुख उपस्थित होत्या. खा. उदयनराजे भोसले म्हणाले, लोकांनी विश्वास टाकून आपल्याला निवडून दिले आहे. त्यामुळे प्रत्येकाने झोकून देऊन कामे करा. नागरिकांचे प्रश्न दूर करा. प्रभागात कामे करताना अडचणी आल्या तर मला सांगा. विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. सर्वांचा सन्मान राखला जाईल. प्रत्येकाला पदे दिली जातील. विरोधात कामे करणाऱ्यांना जवळ केले जाणार नाही. विकास प्रक्रियेत समन्वय असणे महत्वाचे आहे. साताऱ्यात विकासाचा अजेंडा राबूया, असे आवाहनही खा. उदयनराजे भोसले यांनी केले.
दरम्यान, सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्रास देण्याचा प्रयत्न झाला. काहीजणांनी कुरघोड्या करून विरोधकांना जाणीवपूर्वक रसद पुरवली. निवडणुकीवेळी तुम्ही असता तर आणखी जागा निवडून आल्या असत्या, अशी भावना नगरसेवकांनी बोलून दाखवली. तिकीट वाटपात अन्याय झाल्याची नाराजी अपक्षांनी व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक ॲड. डी. जी. बनकर, मनोज शेंडे, प्रशांत आहेरराव, निशांत पाटील, अशोक शेडगे, विनोद मोरे, सुधाकर यादव, मुक्ता लेवे, भारती शिंदे, हेमलता भोसले, आशा पंडित, सुजाता राजेमहाडिक, सिद्धी पवार, वैशाली राजेभोसले, अपर्णा बाचल, शारदा वाघमोडे, विमल गोसावी, अनिता फरांदे, ॲड. मोनिका घोरपडे, सावित्री बडेकर, संकेत साठे, आशा डगळे, ॲड. शुभांगी काटवटे, जयश्री जाधव, मयूर कांबळे, भारती सोळंकी, शांता कोळी उपस्थित होते. याशिवाय या बैठकीला सुनील काटकर, काका धुमाळ, ॲड. शंकर माळवदे, वसंत लेवे, विजय काटवटे, किशोर शिंदे, नाना बाचल, सागर भोसले, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, बाळासाहेब खरात, संतोष कणसे, प्रविण धस्के उपस्थित होते.