कराड : कराड शहरात दोन मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादामुळे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. कराड व मलकापूर येथील दोन गणेश मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन एक जण जखमी झाला. रात्री बारानंतर वाद्य बंद करण्याची सूचना करूनही एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डीजे लावण्याबाबतचा आग्रह धरला होता. वारंवार सूचना करूनही केल्या जाणाऱ्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने अखेर पोलिसांनी बाळाचा वापर केला. एका कार्यकर्त्याला पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी चोप दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाखाली आली.
कराड शहरातील मुख्य बाजारपेठेत कराड व मलकापुरातील दोन गणेश मंडळ एका मागोमाग होते. मलकापूरमधील मंडळाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करताना कराडमधील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर दोन्ही गणेश मंडळाचे परस्परांना भिडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोघांना ताब्यात घेतले. तसेच दोन्ही गणेश मंडळांना दूर करत पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. मात्र या वादात एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
दरम्यान मध्यरात्री १२ नंतर मुख्य बाजारपेठेत विसर्जन मिरवणुकीत असणाऱ्या गणेश मंडळांना सर्व प्रकारची वाद्य बंद करण्याची सूचना पोलिसांनी केली. मात्र भाजीमंडई परिसरातील एक गणेश मंडळ डीजे लावत एका गाण्यावर डान्स करण्याचा आग्रह करत होते. वारंवार सूचना करूनही मंडळाचे कार्यकर्ते पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत असल्याने सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी एका कार्यकर्त्याला चोप दिला. त्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून सर्व गणेश मंडळांना चावडी चौकातून वाद्य बंद करत विसर्जनासाठी प्रीतिसंगमाकडे जाण्यास भाग पाडत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.