‘श्रीराम’वर प्रशासक नेमण्याचा कुटील डाव

आ. रामराजे : ज्यांना उसाची बिले देता येत नाही त्यांच्याकडून मागणी
Satara News |
आ. रामराजे नाईक निंबाळकर Pudhari File Photo
Published on
Updated on

फलटण : ज्यांना स्वतःच्या स्वराज कारखान्यातील शेतकर्‍यांच्या उसाच्या गाळपाची बिले देता येत नाहीत ते माजी खासदार मुख्यमंत्र्यांकडे श्रीराम कारखान्यावर प्रशासक नेमण्याची मागणी करतात. सहकार विभागाच्या आदेशात श्रीराम कारखान्यावर प्रशासक नियुक्तीचा कुठेही उल्लेख नाही. शासनाने केवळ निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यावर प्रशासक नेमण्यासाठी त्यांनी कुटील डाव खेळला आहे, असा आरोप आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

आ. रामराजे पुढे म्हणाले, अत्यंत परिश्रमपूर्वक हा कारखाना शेतकर्‍याच्या मालकीचा ठेवण्यात यशस्वी झालोय. कारखाना चांगल्या अवस्थेत सुरू असून पात्र सर्व सभासदांना सभासदत्व मिळावे, ही आमची भावना आहे. कारखान्याला उर्जितावस्था येत असताना 15 वर्षे विश्वासराव भोसले कुठे होते? एक निवडणूक जिंकल्याने हुरळून जाऊ नका. आता निवडणुकीचे महायुद्ध सुरू होतंय. प्रत्येक निवडणुकीला तयार राहा. इतर नेत्यांची नावे घेऊन तुम्ही कशाला निवडणुकीला सामोरे जाताय? एकदा तरी स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढा? आम्ही इथून पुढच्या सर्व निवडणुकीसाठी सज्ज आहोत. स्वतःच्या ताकदीवर लढा मग बघू, असे आव्हान आ. रामराजेंनी रणजितसिंह ना. निंबाळकर यांना दिले.

आ. रामराजे म्हणाले, फलटण नगरपालिकेत प्रशासक आहे. कसा कारभार चाललाय हे माहित आहे. तेथील प्रशासक यांच्या मागे मागे फिरतात. त्यांनी सांगितलेली कायदेशीर-बेकायदेशीर कामे करत असतात. श्रीराम कारखान्यामध्ये हीच परिस्थिती त्यांना आणावयाची आहे. म्हणून श्रीराम कारखान्यावर प्रशासक नेमण्याची त्यांनी मागणी केली आहे. मात्र हे त्यांचे कुटील कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही, असेही रामराजे म्हणाले. कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे म्हणाले, कारखान्याच्या निवडणुकीसाठी 16 हजार 739 सभासदांची यादी निवडणूक अधिकार्‍यांकडे आम्ही दिली होती. मयत सभासदांबाबत हरकत घेण्यात आल्यानंतर 2124 मयत सभासदांची नावे कमी करून 14,615 सभासदांची यादी सादर केली. निवडणूक अधिकार्‍यांनी ती मान्य केली आहे. 2002 पासून आज पर्यंत मयत सभासदांच्या वारस नोंदी आम्ही केलेल्या आहेत.

विश्वास भोसले यांच्या हरकतीनुसार फक्त 79 सभासदांची यादी झाली असती. मतदानास पात्र असणार्‍या सभासदांची यादी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दिलेली आहे. आम्ही फक्त 79 लोकांचीच यादी पाठवली आहे आणि तेवढेच मतदान करणार, असा गैरसमज पसरवला जात आहे. श्रीराम कारखान्यावर प्रशासक बसणार नाही. विरोधकाकडून दिशाभूलीचे राजकारण सुरू असल्याचेही शेंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी अनिकेतराजे ना. निंबाळकर, संतोष खटके, नितीन भोसले, बापूराव गावडे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news