

कराड : नगरपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे असलेल्या ठिकाणी पक्ष चिन्हावरतीच निवडणूक लढवली जाणार असून जिंकणार ही आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच ज्या जागेवर काँग्रेसचा उमेदवार नाही, तेथे समविचारी पक्षांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
कराड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अमित जाधव, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण, इंद्रजित चव्हाण हेही उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काही दिवसांपासून मी कुटुंबीयांसमवेत बाहेर होतो. अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत असताना कुटुंबीयांना वेळ देता आला नाही. त्यामुळे या कालावधीत मी पूर्णपणे कुटुंबीयांना वेळ दिला होता. या दरम्यान मी भरपूर वाचन केले, काही लिखाणही केले आहे. कराड नगरपरिषद निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले कराडमध्ये आघाडी करण्याबाबत सतेज उर्फ बंटी पाटील यांनी मध्यस्थी केली आहे. महाविकास आघाडी सोडून दुसऱ्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अद्यापही शहराध्यक्ष अमित जाधव यांची इतर पक्षांच्या नेत्यांबरोबर बोलणे सुरू आहे. कोणा एकामुळे माझा पराभव झालेला नाही, त्यामुळे माझ्या मनात कोणाबद्दल काहीही नाही. मात्र ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभा आहेत, तेथे पक्ष चिन्हावरतीच निवडणूक लढवली जाणार आहे. सर्व ठिकाणी उमेदवार उभा करता आले नसले तरी काँग्रेसची पाटी कशाला पुसायची म्हणून आम्ही काँग्रेसच्या चिन्हावरती उमेदवार उभे केले आहेत.
पंधरा नगरसेवक व एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे पक्षचिन्ह वरतीच लढतील आणि निवडूनही येतील. ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार नसेल, तेथे समविचारी पक्षांना पूर्ण सहकार्य केले जाईल. भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी बोलणे सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी फक्त सभा घेणार आहे. कोणाच्याही प्रचारासाठी गल्लीबोळांमध्ये फिरणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जानेवारीमध्ये पुन्हा सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक ठिकाणी दहा वर्षे झालेल्या नाहीत. दहा-दहा वर्षे जनतेला सदस्य निवडण्याचा अधिकार नाही, ही बाब वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. परंतु ते राहून गेले. निवडणुका दोन प्रकारच्या होतात. एक केंद्र स्तरावरती आणि दुसऱ्या स्थानिक स्तरावर. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुद्दा मांडणे गरजेचे होते, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस पक्षात बिलकुल फूट पडणार नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. याबाबतचा अधिकृत निर्णय झाला आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.