

कराड : महिला सक्षम बनल्या तरच देशाची प्रगती होईल. त्यासाठी महिला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळेच काँग्रेसने नेहमीच महिलांना ताकद देण्याचे काम केले असून आपला पक्ष महिला सक्षमीकरणासाठी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
जागतिक महिला दिन, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने वारूंजी फाटा येथील हाँटेल सत्यजित विट्स कराड येथे कराड दक्षिण महिला काँग्रेस आणि सत्यजित पतसंस्था वारुंजी यांनी आयोजित केलेल्या महिला मेळावा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर येथील प्रा. मानसी दिवेकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, सत्यजित ग्रुपचे सर्वेसर्वा माजी पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, प्रा. अरुणा चव्हाण, विद्या थोरवडे, डॉ. भाग्यश्री नयन पाटील, अजित पाटील-चिखलीकर, बाजार समिती संचालक संभाजी चव्हाण, युवा नेते सत्यजित पाटील, वारुंजी सरपंच अमृता पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण यांनी महिला सक्षमीकरणासाठी काँग्रेसने आजपर्यंत केलेल्या कार्याचा उल्लेख केला. स्व. इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांनी देशात महिलांना ताकद दिली. स्व. प्रेमलाकाकी चव्हाण यांनी सुद्धा त्यासाठी योगदान दिले. आज मात्र देशात आणि महाराष्ट्रात ही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून राज्य शासन काहीही पावले उचलताना दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव करत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
प्रा. मानसी दिवेकर यांनी बहिणाबाई यांच्या अनेक ओवींचा संदर्भ देत महिलांना सक्षम होण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर, मनोहर शिंदे, विद्या थोरवडे यांनीही मेळाव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांनी प्रास्ताविक केले. सत्यजित पतसंस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच महिला मेळाव्या आयोजित करण्यामागील आपली भूमिका मांडली. सत्यजित पतसंस्थेत महिला दिनानिमित्त विशेष ठेव योजनेतील सहभागी ठेवीदार महिलांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते ठेव पावत्यांचे वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. कोमल कुंदप यांनी केले, स्वागत आणि आभार डॉ. सौ. भाग्यश्री नयन पाटील यांनी मानले. मेळाव्यानंतर महिलांसाठी लावणी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महिलांनी त्याचा आनंद घेतला. यावेळी कराड दक्षिण मतदारसंघातील विविध विभागातील महिला उपस्थित होत्या.