

कराड : राज्यातील निम्मे म्हणजेच 6.50 कोटी लोक शहरात राहतात. मात्र त्यानंतरही पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी येईपर्यत 70 वर्ष शहरातील समस्यांकडे दुर्लक्षच केले गेले. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला एकट्या अमृत योजनेतून 50 हजार कोटींचा निधी दिला आहे. आमदार डॉ. अतुलबाबांनी सुद्धा कराडच्या परिपूर्ण विकासाचे स्वप्न पाहिले असून त्यांनी प्रस्ताव पाठविले आहेत. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
कराड व मलकापूरमधील नगरपालिका निवडणुकीतील भाजपाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील शिवतीर्थ परिसरातील सभेत ते बोलत होते. मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, खनिज कर्म महामंडळाचे संचालक भरत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम, भाजपाचे राज्य परिषद सदस्य सत्यजितसिंह पाटणकर, प्रदेश संचालन समितीचे सदस्य रामकृष्ण वेताळ, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्यासह सर्व उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपले गाव कोण चालविणार हे ठरविणारी ही निवडणूक आहे. स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष शहरात राज्यातील निम्मी लोकसंख्या 400 शहरात वास्तव्यास होती. मात्र त्यानंतरही शहरांच्या विकासासाठी कोणत्याही योजना आखल्या नव्हत्या आणि त्यामुळेच कचरा, पिण्याचे पाणी, आरोग्य यासह अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या, अशा शब्दात काँग्रेससह मित्र पक्षांवर त्यांनी टीका केली.
आता कचरा वेल्थ निर्माण करणारी गोष्ट बनली असून झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे देण्यासाठी राज्य शासनाने मालकी पट्टे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतून कराडसह राज्यात झोपडपट्टीवासियांना आहे त्याच ठिकाणी पक्की घरे बांधून देणार आहोत. पुणे-बंगळूर आणि कराड-विटा मार्ग जोडण्यासाठी नदी काठाहून रस्ता करणे, स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसर आणि नदी काठचा साबरमती नदीकाठाप्रमाणे विकास करणे यांसह अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प, योजना आणि कराडातील विकासकामांचे प्रस्ताव आ.डॉ.अतुलबाबा यांनी सादर केले आहेत. मागील वर्षभरात विविध विकासकामांसाठी त्यांनी पाठपुरावा करत 400 कोटींचा निधी मिळवला आहे. कराड स्मार्ट करण्यासाठी अतुलबाबांनी स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देत कराडमध्ये भाजपाला बहुमत द्यावे, अशी साद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातली.
आ.डॉ.अतुलबाबा म्हणाले, कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी मिळालेल्या 96.50 कोटींच्या निधीतून गतीने काम सुरु असून दीड वर्षांत मुख्यमत्र्यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन केले जाणार आहे. नगरपालिका इमारत आधुनिकीकरण, कराड व मलकापूरमधील उद्याने, जूना कोयना पूल पाडत नवा फोरलेन पूल बांधणे यांसह अनेक कामांना निधी मिळाला आहे. उर्वरित महत्वाकांक्षी कामांसाठी आवश्यक तेवढा निधी देत मुख्यमंत्री कराडचे नंदनवन करतील, असा विश्वास व्यक्त करत कराडकरांनी भाजपाच्या उमेदवारांना ताकद द्यावी, असे आवाहन डॉ.अतुलबाबा भोसले यांनी केले.
लाडका आमदार अन् बँकेचा मालक......
निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांनी एकत्र येत आपणास घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ते स्वतःला समविचारी म्हणवत असले तरी महायुती व महाविकास आघाडीची विचारधारा पूर्ण वेगळी आहे. त्यामुळे ते समविचारी कसे, असा प्रश्न उपस्थित करत आ.अतुलबाबांनी मला अनेकांनी जुळवून घ्या, असे सांगितले होते. पण मी तत्वाशी तडजोड केली नाही. समोर दिग्गज असून त्यांच्याएवढी माझी ताकद नसली तरी मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आमदार आहे, हे लक्षात ठेवा. तिजोरीची चावी आमच्याकडे आहे, असे अनेकजण म्हणत असले तरी बँकेचा मालक आमच्याकडे आहे, असे सांगत लोकांच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आ.डॉ.अतुलबाबा यांनी दिली.