

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्याला आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलनाच्या व्यासपीठावर पूर्णवेळ मोबाईलमध्येच होते. राज्यातील महानगरपालिकांच्या बंडखोऱ्या शमवण्यासाठी संमेलनाच्या व्यासपीठावरुनच मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी सुरु होती. जाहीर भाषणातही त्यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला आले होते. उदघाटन सोहळ्यात लेखक व अन्य मान्यवरांची भाषणे सुरु होती. मात्र मुख्यमंत्र्यांना सातत्याने फोनवर बोलावे लागत होते. त्यांचे स्वीय्यसहाय्यक क्षणाक्षणाला त्यांना फोन जोडून देत होते. त्यामुळे श्रोत्यांमध्येही कुजबुज सुरु होती.
मुख्यमंत्र्यांनी स्वत:च आपल्या भाषणात याबाबतची कबुली दिली. ते म्हणाले, आपणा सर्वांना माहित आहे की मी मंचावर बसून कधीही मोबाईलवर बोलत नाही. आज मात्र सारखा मोबाईलवर बोलत होतो. त्यासाठी माफी मागतो. आज महानगरपालिका निवडणुकांमध्ये अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सर्व पक्षांमध्ये बंडखोरी असल्यामुळे बंडखोरांची मनधरणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे भाषणे सुरू असताना त्या-त्या कार्यकर्त्यांशी मी बोलत होतो. फॉर्म परत घे, अशी विनंती त्यांना करत होतो. त्यामुळे ही दुष्टता करावी लागली. फोनवर बोलल्यामुळे सर्वांची माफी मागतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली.