

साखरवाडी : वाढदिवसानीदिनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर दौऱ्यावर असताना फलटण तालुक्यातील सुरवडी येथे काही काळासाठी धावती भेट दिली. प्रवासादरम्यान येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी चहापान केले. मुख्यमंत्र्यांच्या या धावत्या भेटीमुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, फलटणचे आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, दिलीपसिंह भोसले, पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विक्रमसिंह भोसले आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढदिवस असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. तसेच फलटण तालुक्याच्या विविध विकासकामांबाबत आणि स्थानिक प्रश्नांबाबत त्यांच्याशी थोडक्यात चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींशी संवाद साधत विकासकामांना गती देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे सांगितल्याची माहिती उपस्थितांकडून देण्यात आली.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सुरवडी येथे मुख्यमंत्री थांबणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
मुख्यमंत्र्यांशी १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा...
सुरवडी येथील धावत्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका स्वतंत्र कक्षात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, फलटणचे आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमवेत सुमारे १५ मिनिटे बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेत फलटण तालुक्यातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच आगामी विकास आराखड्यांबाबत विचारविनिमय झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, या बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील समोर आलेला नाही.