

सातारा : अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली कट ऑफ लिस्ट शुक्रवार दि. 29 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रवेश नोंदणी करताना अपलोड केलेली कागदपत्रे योग्य आहेत का याची पडताळणी करुन अर्ज निश्चित करणे तसेच अलॉटमेंटनुसार महाविद्यालयांची गुणवत्तायादी तयार करणे यासाठी महाविद्यालयांमध्ये लगबग सुरु आहे. तर कोणते महाविद्यालय मिळणार, त्यासाठी कट ऑफ किती लागणार याची उत्सुकता विद्यार्थी व पालकांना लागली आहे.
मागील वर्षापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीयस्तरावर ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दहा महाविद्यालये निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यापैकी कोणते महाविद्यालय मिळणार हे या प्रवेश फेरीमध्ये कळणार आहे. प्रवेश अर्ज नोंदणी, भाग 2 भरुन झाल्यावर महाविद्यलयांमधील रिक्त जागा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या जागांवरील प्रवेशासाठी पहिलीकट ऑफ यादी जाहीर होणार आहे.
त्यानुसार विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात उपस्थित राहणे, प्रवेश निश्चिती व प्रवेश अर्जासोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांची सत्य प्रतींची पडताळणी करुन घेणे किंवा प्रवेश रद्द करणे यासाठी दि. 3 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दि. 5 जून रोजी दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे, दि. 6 जून रोजी रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहेत.