

सातारा : उन्हाच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 6 गावे व 67 वाड्यांमधील नागरिकांना 8 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जस जसे उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर आणखी पाण्याच्या टँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सातारा जिल्ह्यात दिवसभर कडक ऊन व पहाटे तीव्र थंडी लागत आहे. उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात लागत आहेत. त्यामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे. जलस्त्रोतही जिल्ह्याच्या काही भागात उघडे पडू लागले आहेत. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यातच नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ज्या गावांत पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे, अशा गावांनी तहसील कार्यालयाकडे टँकरच्या मागणीसंदर्भात प्रस्ताव सादर केले होते. तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागमार्फतही ज्या गावात टँकरची गरज आहे. अशा गावांचे सर्वेक्षण करुन प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार माण तालुक्यातील काही गावात व वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
माण तालुक्यातील मोही, धुळदेव, वरकुटे-म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, जाशी या गावासह 67 वाड्या वस्त्यांमधील 10 हजार 132 नागरिक व 9 हजार 70 जनावरांना 8 टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्यानंतर पाण्याचे स्त्रोत आणखी उघडे पडणार आहेत. त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात टँकरची मागणी गावोगावी वाढणार आहे.