

सातारा : नवीन शैक्षणिक वर्षास सोमवार दि. 16 जूनपासून प्रारंभ होत असल्याने शैक्षणिक प्रांगण बहरून जाणार असून विद्यार्थ्यांचा किलबिलाट अन् गलबलाट पुन्हा सुरू होणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 3 हजार 493 प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत होणार आहे. शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या आयोजनाबरोबर गोडधोड जेवणाचा बेतही आयोजित केला आहे. तसेच लोकप्रतिनिधींबरोबर वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.
मागील दीड महिना सुरू असलेली उन्हाळी सुट्टी संपल्याने आजपासून शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शाळा सुरू होणार असल्याबाबत ग्रामीण भागात दवंडी काढून विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. शाळेच्या विद्यार्थी व पालकांच्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर माहिती दिली जाणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश यासह शालेय साहित्याचे वितरण केले जाणार आहे.
लोकप्रतिनिधी तसेच सर्व सनदी अधिकार्यांच्या शाळांना भेटी होणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी गावातून प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. शाळांमध्ये येणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून वाजत गाजत स्वागत करावे. शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोडी लागावी यासाठी गोड शिरा, खीर, गोड भात, जिलेबी, गुलाबजाम, मोतीचूर लाडू यासह मिष्टान्न भोजनाचे आयोजन करावे अशा सूचना शिक्षण विभागामार्फत सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. गटशिक्षणाधिकार्यांनी अधिनस्त सर्व पर्यवेक्षीय यंत्रणाच्या शाळा भेटीचे नियोजन करावे. तालुक्यामध्ये 100 शाळांना भेटी या उपक्रमांतर्गत शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही त्याबाबतचा अहवाल शिक्षण विभागास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.